MI vs RCB, 1 Innings Highlights: ग्लेन मॅक्सवेल आणि कर्णधार फाफ डु प्लेसिस यांच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर आरसीबीने निर्धारित 20 षटकात 199 धावांपर्यंत मजल मारली. मॅक्सवेल आणि फाफ यांच्याशिवाय तळाला दिनेश कार्तिक यानेही फटकेबाजी केली. जेसन बेहरनड्रॉफ याने तीन विकेट घेतल्या... मुंबईला विजयासाठी 200 धावांचे आव्हान देण्यात आलेय.
मॅक्सवेल-फाफने डाव सावरला -
विराट कोहली आणि अनुज रावत झटपट बाद झाल्यानंतर आरसीबीची फलंदाजी ढेपाळते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली. पण ग्लेन मॅक्सवेल आणि कर्णधार फाफ डु प्लेसिस यांनी आरसीबीचा डाव सावरला. फाफ याने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. तर मॅक्सेवल याने पहिल्यापासूनच वादळी फलंदाजी केली. मॅक्सवेल आणि फाफ यांनी मुंबईच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. तिसऱ्या विकेटसाठी मॅक्सवेल आणि फाफ डु प्लेसिस यांनी 62 चेंडूत 120 धावांची भागिदारी केली. यामध्ये मॅक्सवेलचे योगदान 68 धावांचे होते. मॅक्सवेल याने 33 चेंडूत 68 धावांच खेळी केली. या खेळीत मॅक्सवेल याने चार षटकार आणि आठ चौकार लगावले. फाफ डु प्लेसिस याने 41 चेंडूत 65 धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने तीन षटकार आणि पाच चौकार लगावले. फाफ डु प्लेसिस याने कर्णधाराला साजेशी फलंदाजी करत मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला.
दिनेश कार्तिकची छोटेखानी खेळी -
दिनेश कार्तिक याने अखेरीस वादळी फलंदाजी केली. कार्तिकने 18 चेंडूत एक षटकार आणि चार चौकाराच्या मदतीने 30 धावांचे योगदान दिले. कार्तिकच्या वादळी फलंदाजीमुळे आरसीबीच्या डावाला आकार मिळाला. अखेरीस हसरंगा आणि दिनेश कार्तिक यांनी धावांचा पाऊस पाडत आरसीबीची धावसंख्या 199 पर्यंत नेली.
इतरांचा फ्लॉफ शो -
भन्नाट फॉर्मात असणाऱ्या विराट कोहलीला मोठी खेळी करता आली नाही. अवघ्या एका धावेवर विराट कोहली बाद झाला. जेसन बेहरनड्रॉफ याने विराट कोहलीला बाद केले. तर अनुज रावतही सहा धावा काढून लगेच तंबूत परतला. महिपाल लोमरोर याला फक्त एक धाव काढता आली.
मुंबईची गोलंदाजी कशी ?
मुंबईकडून जेसन बेहरनड्रॉफ याने अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. जेसन याने पहिल्यापासूनच आक्रमक मारा केला. पावरप्लेमध्ये जेसन याने आरसीबीला दोन धक्के दिले. जेसन हेहरनड्रॉफ याने आरसीबीच्या तीन फलंदाजांना तंबूत पाठवले. पीयूष चावला याला आज एकही विकेट घेता आली नाही, त्याने चार षटकात 41 धावा खर्च केल्या. कॅमरुन ग्रीन याने दोन षटकात 15 धावांच्या मोबद्लयात एक विकेट घेतली. कुमार कार्तिकेय आणि ख्रिस जॉर्डन यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.
ख्रिस जॉर्डन याला जोफ्रा आर्चरच्या जागेवर संघात स्थान देण्यात आलेय. पण जॉर्डन याला प्रभावी गोलंदाजी करता आली नाही. जॉर्डन याने चार षटकात 48 धावा खर्च केल्या.