IPL 2023, RCB vs KKR : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये 36 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना पाहायला मिळाला. या सामन्यात कोलकाताने आरसीबीवर 21 धावांनी विजय मिळवला. बंगळुरुमधील एम. चिन्नवामी स्टेडियममध्ये हा सामना पार पडला. बंगळुरू संघाचा कर्णधार विजय कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना कोलकाताने 20 षटकांत 5 गडी गमावून 200 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना बंगळुरू संघाला 20 षटकांत आठ गडी गमावून फक्त 179 धावा करता आल्या. त्यामुळे बंगळुरुच्या घरच्या मैदानावरच आरसीबीला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यातील विजयानंतर कोलकाता संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे.


चेन्नई पहिल्या स्थानावर कायम


बंगळुरुविरोधात विजयानंतर कोलकाता संघाकडे 6 गुण असून संघाचा नेट रनरेट -0.027 आहे. दरम्यान, पराभवानंतर बंगळुरु संघाच्या स्थानामध्ये कोणताही बदल झालेला नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु कोलकाता नाईट रायडर्स विरोधातील सामन्याआधी गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर होता. कोलकाताकडून पराभवानंतरही आरसीबी 8 गुण आणि -0.139  नेट रनरेट सह पाचव्या क्रमांकावर आहे. संघाने आतापर्यंत आठ पैकी चार सामने जिंकले आहेत.


गुणतालिकेतील हे टॉप-5 संघ कोणते?


गुणतालिकेत चेन्नई सुपर किंग्स पहिल्या स्थानावर आहे. संघाने आतापर्यंतच्या 7 सामन्यांपैकी 5 सामन्यांत विजय मिळवला आहे. चेन्नईकडे 10 गुण आणि +0.662 नेट रनरेट आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर गतविजेता गुजरात टायटन्स संघ आहे. संघाने पाच सामन्यांत विजय मिळवला आहे. गुजरात संघाकडे 10 गुण आणि +0.580 नेट रनरेट आहे. याशिवाय राजस्थान रॉयल्स 7 पैकी 4 सामन्यांत विजय मिळवून 8 गुण आणि +0.844 नेट रनरेटसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. लखनौ चौथ्या तर बंगळुरु पाचव्या स्थानावर आहे. लखनौ सुपर जायंट्स संघाने 7 पैकी चार सामन्यात विजय मिळवला असून संघाकडे 8 गुण आणि 0.547 नेट रनरेट आहे.


इतर संघांची परिस्थिती काय?


पंजाब किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहेत. पंजाब किंग्स संघ 7 पैकी 4 सामन्यात विजयानंतर 8 गुण आणि -0.162 नेट रनरेटसह सहाव्या क्रमांकावर आहे. कोलकाता संघाकडे 6 गुण आणि -0.027 नेट रनरेट असून संघ सातव्या क्रमांकावर आहे. मुंबई इंडियन्स आठव्या क्रमांकावर आहे. मुंबईने आतापर्यंत 7 पैकी 3 सामन्यांमध्ये विजय मिळवला असून संघाकडे 6 गुण आणि - 0.620 नेट रनरेट आहे. सनरायझर्स हैदराबाद संघ 7 सामन्यांपैकी 2 सामन्यांत विजय मिळवल्यानंतर संघ 4 गुण आणि -0.725 नेट रनरेटसह नवव्या क्रमांकावर आहे. गुणतालिकेत सर्वात दिल्ली कॅपिटल्स संघ शेवटच्या क्रमांकावर आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने 7 पैकी 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. संघ 4 गुण आणि -0.961 नेट रनरेटसह दहाव्या स्थानावर आहे.