MI vs GT, Match Highlights : मोहित शर्मा आणि मोहम्मद शमीच्या भेदक माऱ्यापुढे मुंबईच्या फलंदाजांनी लोटांगण घातले. मोहित शर्मा याच्या पाच विकेटच्या बळावर गुजरातने मुंबईचा 62 धावांनी पराभव केला. गुजरातने दिलेल्या 234 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा संघ 18.2 षटकात 171 धावांवर गारद झाला. मुंबईकडून एकट्या सूर्यकुमार यादवने झुंज दिली.  मोहित शर्मा याने मुंबईचा अर्धा संघ तंबूत पाठवला. तर प्रथम फलंदाजी करताना शुभमन गिल याने शतकी खेळी केली.  28 मे रोजी गुजरात आणि चेन्नई यांच्यामध्ये फायनलचा थरार रंगणार आहे. 


सूर्याचे वादळी अर्धशतक - 


आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव याने एकाकी झुंज केली. सूर्यकुमार यादव याने 38 चेंडूत 61 धावांची खेळी केली. या खेळीत सुर्याने दोन षटकार आणि सात चौकार लगावले. सूर्यकुमार यादव याने झंझावाती फलंदाजी करत मुंबईच्या विजयासाठी सर्वस्वी प्रयत्न केले. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी 22 चेंडूत 51 धावांची भागिदारी केली. तर सूर्यकुमार यादव आणि कॅमरुन ग्रीन यांनी 32 चेंडूत 51 धावांची भागिदारी केली. सूर्यकुमार यादव आणि विनोद यांच्यामध्ये 19 चेंडूत 31 धावांची भागिदारी केली. 


सलामी फ्लॉप - 


234 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात निराशाजनक झाली. रोहित शर्मा आणि नेहाल वढेरा इम्पॅक्ट पाडण्यात अपयशी ठरले.  नेहाल वढेरा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरला होता. पण फक्त चार धावांवर शमीने त्याला तंबूत धाडले. कर्णधार रोहत शर्माही मोठी खेळी करण्यात फेल गेला. रोहित शर्मा आठ धावांवर तंबूत परतला. मोहम्मद शमी याने मुंबईच्या सलामी जोडीला तंबूत धाडले. 


तिलक-ग्रीनची आक्रमक फलंदाजी - 


दोन विकेट झटपट पडल्यानंतर सूर्यकुमार यादव याने एका बाजूला दमदार फलंदाजी केली. दुसऱ्या बाजूला कॅमरुन ग्रीन आणि तिलक वर्मा यांनी वादळी फलंदाजी केली. तिलक वर्मा याने 14 चेंडूत 43 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने तीन षटकार आणि पाच चौकार लगावले. कॅमरुन ग्रीन याने 20 चेंडूत 30 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने दोन षटकार आणि दोन चौकार लगावले.


इशानच्या दुखापतीचा मुंबईला फटका - 


फिल्डिंग करताना इशान किशन याला दुखापत झाली होती. इशान किशन याच्या डोळ्याला मार लागला, त्यामुळे बदली खेळाडू म्हणून विष्णू विनोद मैदानात उतरला होता. इशान किशन दुखापतग्रस्त झाल्यामुळे नेहल वढेरा आणि रोहित शर्मा यांना सालमी करावी लागली. इशान मुंबईला आक्रमक सुरुवात करुन देण्यात तरबेज आहे, पण दुखापतीमुळे त्याला फलंदाजी करता आली नाही. याचाच फटका मुंबईला बसला. 


फलंदाजांची हराकिरी - 


मुंबईच्या फलंदाजांनी हराकिरी केली.. कर्णधार रोहित शर्मा याला मोठी खेळी करता आली नाही. त्याशिवाय नेहल वढेरा, टीम डेविड आणि विष्णू विनोदही फ्लॉप गेले.  कॅमरुन ग्रीन याला चांगली सुरुवात मिळाली, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. रोहित शर्मा 8, नेहल वढेरा 4, कॅमरुन ग्रीन 30, विष्णू विनोद 5, टीम डेविड 2, ख्रिस जॉर्डन 2 धावांवर तंबूत परतले. पीयूष चावला याला खातेही उघडता आले नाही. 


मोहितचा भेदक मारा - 
मोहित शर्मा याच्या भेदक माऱ्यापुढे मुंबईच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. मोहित शर्मा याने 2.2 षटकात 10 धावांच्या मोबदल्यात पाच विकेट घेतल्या. मोहम्मद शमी आणि राशिदखान यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. तर जोस लिटिल याला एक विकेट मिळाली.