Mumbai Indians : रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सने यंदाच्या हंगामात आतापर्यंत सरासरी कामगिरी केली आहे. पाच वेळच्या विजेत्या मुंबईला सहा सामन्यात तीन पराभव आणि तीन विजय मिळाले आहेत. सूर्यकुमार यादव, ईशान किशन, रोहित शर्मा, कॅमरुन ग्रीन आणि जोफ्रा आर्चर यासारखे मुंबईचे दिग्गज खेळाडू फ्लॉप गेले आहेत. या खेळाडूंना आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मुंबईने या खेळाडूंवर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. महागडे खेळाडू फ्लॉप जात आहेत.. पण मुंबईसाठी जमेची बाजू म्हणजे... स्वस्तात घेतलेले खेळाडू प्रभावी कामगिरी करत आहे. पाहूयात अशाच पाच खेळाडूबद्दल.. स्वस्तात घेतलेय... पण त्यांच्याकडून जबराट कामगिरी पाहायला मिळत आहे. 


पीयूष चावला - 


अनुभवी पीयुष चावला याला लिलावात कुणीही बोली लावायला तयार नव्हते. अशात मुंबईने पीयुष चावलावर विश्वास दाखवला.. मुंबईने पीयुष चावला याला 50 लाख रुपयांत आपल्या संघात घेतले. पीयूष चावला मुंबईचा यंदाच्या हंगामातील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. विकेट तर घेतोय... त्याशिवाय धावाही रोखतोय. 


अर्जुन तेंडुलकर - 


मुंबईने 2021 मध्ये अर्जुन तेंडुलर याला 20 लाख रुपायंच्या बेस प्राईजमध्ये खरेदी केले होते. त्यानंतर दोन हंगामात त्याला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळाले नाही. तो बेंचवरच होता. 2023 च्या लिलावात मुंबईने अर्जुनला पुन्हा खरेदी केले. अर्जुन तेंडुलकर याने यंदाच्या हंगामात तीन सामन्यात  मुंबईसाठी गोलंदाजी केली आहे. यामध्ये दोन विकेट त्याने घेतल्या आहेत. अर्जुन तेंडुलकर याने अखेरच्या षटकात 20 धावांचा बचाव केला होता. अर्जुन तेंडुलकर पावरप्लेमध्ये जबरदस्त गोलंदाजी करत असल्याचे दिसतेय. 
 
तिलक वर्मा : 


तिलक वर्मा याचे आजी-माजी क्रिकेटर कौतुक करत आहे. रवी शास्त्री यांच्या मते तर तिलक वर्मा लवकरच टीम इंडियात पदार्पण करेल. मुंबईने तिलक वर्माला अवघ्या 1.70 कोटी रुपयात खरेदी केले होते. 2022 मध्ये 14 सामन्यात तिलक वर्माने 397 धावांचा पाऊस पाडला होता. त्या हंगामात मुंबईकडून सर्वाधिक धावा काढणारा तो फलंदाज ठरला होता. गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही तिलक वर्मा भन्नाट फॉर्मात दिसतोय.  आतापर्यंत तिलक वर्माने 200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.  


जेसन बेहनड्रॉफ : 


मुंबईने 2022 मद्ये जेसन बेहनड्रॉफ याला आरसीबीकडून ट्रेड केले... आरसीबीने 775 लाख रुपयात जेसनला आपल्या संघात घेतले होते. पण आयपीएलच्या 16 व्या हंगामाआधी मुंबईने त्याला ट्रेड केले. जेसन बेहनड्रॉफ याने आतापर्यंत चार सामन्यात सहा विकेट घेतल्या आहेत. 


ऋतिक शौकीन : 


2022 च्या मेगा लिलावात मुंबई ऋतिक शौकीन याला 20 लाख रुपयांत आपल्या संघात घेतले होते. गेल्यावर्षी ऋतिकने मुंबईकडून आयपीएल पदार्पण केले. त्याआधी ऋतिक याने एकही टी 20 सामना खेळला नव्हता. आतापर्यंत मुंबईकडून ऋतिक याने दमदार कामगिरी केली आहे. धावा रोखण्यासोबत विकेटही घेण्यात ऋतिक तरबेज आहे.