IPL 2023 : धोनीला 41 व्या वर्षात फलंदाजी करताना पाहिल्यानंतर "शेर बूढ़ा हुआ है, पर शिकार करना नहीं भूला" असेच डोक्यात येते. धोनीने लखनौविरोधात दोन चेंडूवर दोन षटकार मारले. मार्क वूडच्या वेगापुढे धोनीने दोन गगनचुंबी षटकार लगावले. धोनीच्या फलंदाजीवर वयाचा कोणताही फरक पडल्याचे दिसत नाही. धोनीने गुजरातविरोधातही षटकार लगावला होता. आजही धोनीने दोन षटकार मारत प्रतिस्पर्धी संघाला आपण अद्याप बेस्ट फिनिशर असल्याचे दाखवून दिले. आज धोनीने षटकार लगावत आयपीएलमध्ये पाच हजार धावांचा पल्लाही पार केला.
41 वर्षीय धोनीने चार वर्षापूर्वी 2019 मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर तो फक्त आयपीएलमध्ये खेळताना दिसत आहे. प्रत्येकवर्षी धोनी अपग्रेड होत असल्याचे दिसत आहे. कॅप्टन कूल धोनी चौकार आणि षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध आहे. अखेरच्या षटकात धोनी धावांचा पाऊस पाडतो. 20 षटकात सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रमही धोनीच्या नावावर आहे. या हंगामात धोनीने दहा चेंडूचा सामना केलाय. यामध्ये त्याने तीन षटकार आणि एक चौकार लगावला होता. धोनीने यंदाच्या हंगमात 10 चेंडूत 26 धावा वसूल केल्या.
चार वर्षानंतर एमएस धोनी चेपॉक स्टेडिअमवर उतरला. त्यानंतर उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांनी धोनी धोनीच्या घोषणा सुरु केल्या. धोनीला पाहताच स्टेडिअममधील चाहत्यांमध्ये उत्साह आला होता.
धोनीचा पाच हजार धावांचा पल्ला -
लखनौविरोधात दोन गगनचुंबी षटकार मारताच धोनीने आयपीएलमधील पाच हजार धावांचा पल्ला पार केला. धोनीने 208 डावात 5004 धावा केल्या आहेत. यादरम्यान धोनीने 84 धावांची सर्वोत्कृष्ट खेळी केली. एमएस धोनीने आयपीएलमध्ये 24 अर्धशतके झळकावली आहेत. 208 डावात धोनीने 232 षटकार लगावले आहेत. तर 347 चौकरांचा पाऊस पाडला आहे. धोनीला सर्वोत्तम फिनिशर म्हणूनही ओळखले जाते. धोनी आयपीएलमध्ये पाच हजार धावा पूर्ण करणारा सातवा खेळाडू ठरलाय. धोनीच्या आधी एबी डिव्हिलिअर्स, सुरेश रैना, रोहित शर्मा, डेविड वॉर्नर, शिखर धवन आणि विराट कोहली यांनी पाच हजार धावांचा पल्ला पार केला. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा विराट कोहलीच्या नावावर आहेत. विराट कोहलीने सहा हजार धावांचा पल्ला पार केला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ख्रिस गेलच्या नावावर आहेत. गेल याने आयपीएलमध्ये 357 षठकार आणि 405 चौकार लगावले आहेत.