IPL 2023, MI vs GT: वानखेडे मैदानावर मुंबईने गुजरातचा २७ धावांनी पराभव केला. मुंबईने दिलेल्या २१९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातचा संघाने १९१ धावांपर्यंत मजल मारली. गुजरातकडून एकट्या राशिद खान याने झुंज दिली. राशिद खान याने गोलंदाजीत चार विकेट घेतल्या. त्यानंतर फलंदाजी करताना नाबाद ७९ धावांची खेळी केली. गुजरातकडून मधवाल याने तीन तर चावला याने दोन विकेट घेतल्या. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत तिसऱ्य क्रमांकावर झेप घेतली आहे. गुजरात पहिल्या स्थानावर कायम आहे. 


२१९ धावांचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात अतिशय खराब झाली. पावरप्लेमध्ये गुजरातने तीन आघाडीचे फलंदाज गमावले होते. वृद्धीमान साहा २, शुभमन गिल ६ आणि हार्दिक पांड्या चार धावांवर स्वस्तात माघारी मरतले. युवा आकाश मधवाल याने पावरप्लेमध्ये गुजरातच्या सलामी जोडीला माघारी पाठवले... तीन फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर विजय शंकर आणि डेविड मिलर यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. विजय शंकर याने १४ चेंडूत २९ धावांचे योगदान दिले. यामध्ये सहा चौकाराचा समावेश होता. तर डेविड मिलर याने २६ चेंडूत ४१ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने दोन षटकार आणि चार चौकार लगावले.


अभिनव मनोहर आणि राहुल तेवातिया यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. अभिनव मनोहर अवघ्या दोन धावांवर बाद झाला. तर राहुल तेवातिया याने १४ धावांची खेळी केली. यामध्ये एका चौकाराचा समावेश होता. आघाडीचे सहा फलंदाज १०० धावांत बाद झाल्यानंतर मुंबई हा सामना मोठ्या फरकाने जिंकेल,असा अंदाज बांधला जाऊ लागला. पण राशिद खान याने एकाकी झुंज दिली. राशिद खान याने वादळी फलंदाजी करत मुंबईच्या आशावर पाणी फेरले. 


राशिद खान याने अल्जारी जोसेफ याला हाताशी धरत गुजरातचा मोठा पराभव टाळला. राशिद खान याने ३२ चेंडूत ७९ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने दहा षटकार लगावले.. त्याशिवाय तीन चौकारही मारले.. राशिद खान याने अल्जारी जोसेफ याच्यासोबत ४० चेंडूत ८८ धावांची भागिदारी केली. नवव्या विकेटसाठी या दोघांनी तब्बल ८८ धावा जोडल्या.  यामध्ये राशिद खान याचे योगदान ७७ धावांचे होते. तर अल्जारी जोसेफ सात धावांचे योगदान होते. राशिद खान याच्या वादळी खेळीमुळे गुजरातचा मोठा पराभव टळला. 


दरम्यान, मुंबईकडून आकाश मधवाल याने भेदक मारा केला. मधवाल याने तीन विकेट घेतल्या. तर कुमार कार्तिकेय आणि पीयूष चावला यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. जेसन बेहरनड्रॉफ याला एकविकेट मिळाली.