IPL 2023, MI vs RCB : तिलक वर्माच्या झंझावती अर्धशतकाच्या बळावर मुंबईने 171 धावांपर्यंत मजल मारली. तिलक वर्मा याने नाबाद 84 धावांची खेळी केली. तिलक वर्माचा अपवाद वगळता एका फलंदाजाला 30 धावांची संख्या ओलाडंता आली नाही. आरसीबीला विजयासाठी 172 धावांचे आव्हान देण्यात आले आहे. मुंबईने सात विकेटच्या मोबदल्यात 171 धावांपर्यंत मजल मारली.


तिलक वर्माची एकाकी झुंज - 


मुंबई इंडियन्सचा गेल्या हंगामातील हिरो तिलक वर्मा याने  यंदाच्या हंगामतील पहिल्याच सामन्यात झुंझार खेळी केली. तिलक वर्मा याने शानदार अर्धशतक झळकावले. एका बाजूला विकेट पडत तिलक वर्मा याने संयमी आणि आक्रमकपणे अर्धशतक झळकावले. तिलक वर्माने नेहाल वढेरासोबत अर्धशतकी भागिदारी करत मुंबईची धावसंख्या वाढवली. तिलक वर्माने दबावात अर्धशतक झळकावले. तिलक वर्मा याने 46 चेंडूत 84 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 4 षटकार आणि 9 चौकार लगावले. 


रोहित शर्माची खराब खेळी  -


कर्णधार रोहित शर्माला कर्णधाराला साजेशी फलंदाजी करता आली नाही. इशान किशन आणि कॅमरुन ग्रीन बाद झाल्यानंतर रोहित शर्माने आपली विकेट फेकली. रोहित शर्माने दहा चेंडूचा सामना करताना फक्त एक धाव केली. आकाशदीपने रोहित शर्माला बाद केले. 


ईशान-सूर्या फ्लॉप - 
ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांना आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. ईशान किशन याने 13 चेंडूत फक्त 10 धावा केल्या. मोहम्मद सिराज याने ईशान किशनचा अडथळा दूर केला. जगातील आघाडीचा टी 20 खेळाडू सूर्यकुमार यादव यालाही मोठी खेळी करता आली नाही. सूर्यकुमार यादव 16 चेंडूत 15 धावा काढून बाद झाला. ब्रेसवेल याने सूर्याचा अडथळा दूर केला. ऋतिक शौकिन यालाही मोठी खेळी करता आली नाही. तो पाच धावा काढून तंबूत परतला. 


नेहाल वढेराची छोटेखानी खेळी - 
युवा नेहाल वढेरा यांनी 21 धावांची ताबोडतोड खेळी केली. नेहाल शर्मा याने 13 चेंडूत 21 धावांची खेळी केली. आघाडीचे फलंदाज फ्लॉप ठरल्यानंतर नेहाल वढेरा याने दोन षटकार आणि एका चौकारासह मुंबईची धावसंख्या वाढवली. 


कॅमरुन ग्रीन-टीम डेविड स्वस्तात बाद - 


विस्फोटक फलंदाज टीम डेविड आणि कॅमरुन ग्रीन स्वस्तात बाद झाले. या दोघांनाही मोठी खेळी करता आली नाही. टीम डेविड 4 तर ग्रीन पाच धावांवर बाद झाला. ग्रीनला रीस टोप्लीने तर टीम डेविड याला कर्ण शर्माने तंबूत पाठवले.  


मोहम्मद सिराजचा भन्नाट स्पेल - 


फॉर्मात असलेल्या मोहम्मद सिराज याने आयपीएल 16 च्या पहिल्याच सामन्यात भेदक मारा केला. सिराजने पॉवरप्लेमध्ये तीन षटके कंजूष गोलंदाजी केली. सिराजने तीन षटकात अवघ्या पाच धावा खर्च केल्या आणि एक विकेट घेतली. मोहम्मद सिराज याने इशान किशन याचा अडथळा दूर केला. पण अखेरच्या षटकात सिराज याने पाच वाईड फेकत धावा लुटल्या. सिराजने अखेरच्या षटकात 16 धावा दिल्या. यामध्ये पाच अतिरिक्त धावा आहेत. सिराजने चार षटकात 21 धावा देत एक विकेट घेतली. 


कर्ण शर्माने चार षटकात 32 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. रीस टोप्ली याने दोन षटकात 14 धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली. ब्रेसवेल याने दोन षटकात 16 धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली. अकाशदीप याने दोन षटकात 29 धावां खर्च करत एका फलंदाजाला तंबूत पाठवले.  हर्षल पटेल याने चार षटकात 43 धावा खर्च करत एक विकेट घेतली. 


रीस टोप्ली दुखापतग्रस्त -
आरसीबाचा वेगवान गोलंदाज रीस टोप्ली दुखापतग्रस्त झाला आहे. फिल्डिंग करताना रीस टोप्ली याच्या खांद्याला दुखापत झाली. ही दुखापत गंभीर होती, त्यामुळे रीस टोप्ली याला मैदानाबाहेर जावे लागले. रीस टोप्ली याच्यावर फिजिओ उपचार करत आहेत. रीस टोप्ली याची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत अद्याप कोणताही माहिती समोर आलेली नाही. याआधीच दुखापतीमुळे गुजरातला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे केन विल्यमसन संपूर्ण आयपीएलला मुकला आहे. आता आरसीबीच्या प्रमुख गोलंदाजाला दुखापत झाली आहे.