Lucknow Super Giants vs Delhi Capitals : राहुलच्या नेतृत्वातील लखनौ आणि डेविड वॉर्नरच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्स यांच्यात शनिवारी काटें की टक्कर पाहायला मिळणार आहे. लखनौच्या इकाना क्रिकेट ग्राऊंडवर दोन्ही संघ पहिल्या विजयासाठी मैदानात उतरतील. लखनौ संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा भरणा आहे. अष्टपैलू खेळाडूमुळे हा संघ संतुलित वाटतोय. त्यामुळे पहिल्या सामन्यासाठी प्लेईंग 11 निवडताना कर्णधार राहुल आणि संघ व्यवस्थापकाची डोकेदुकी वाढणार आहे. 


2022 मध्ये लखनौ संघाने पहिल्यांदा आयपीएलमध्ये पदार्पण केलेय. पहिल्याच आयपीएल हंगामात लखनौ संघाने सर्वांना प्रभावित केले. राहुलच्या नेतृत्वात लखनौ संघाने प्लेऑफपर्यंत प्रवास केला होता. आता नव्या हंगामात नवी तयारीसह लखनौ संघ मैदानात उतरले.. पण पहिल्या दोन सामन्यात दोन अनुभवी खेळाडूशिवाय लखनौ संघ मैदानात उतरणार आहे. राहुलसोबत सलामीची जबाबदारी पार पाडणारा क्विंटन डी कॉक आणि वेगवान गोलंदाज मोहसिन खान पहिल्या दोन सामन्यासाठी उपलब्ध नाहीत. गेल्या हंगामात या दोन्ही खेळाडूंनी दमदार कामगिरी केली होती. 


क्विंटन डी कॉक सध्या आतंरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यात व्यस्त आहे. दक्षिण आफ्रिका संघाने त्याला अद्याप रिलिज केलेले नाही. तर मोहसिन खान अद्याप पूर्णपणे फिट नाही. अशात लोकेश राहुल याच्यासोबत सलामीला निकोलस पूरन उतरण्याची शक्यता आहे. मिनी ऑक्शनमध्ये निकोलस पूरन याला लखनौ संघाने 16 कोटी रुपयात खरेदी केले होते. 


अष्टपैलू कोण कोण -


लखनौ सुपर जायंट्स संघात तीन प्रमुख अष्टपैलू खेळाडू आहेत. क्रृणाल पांड्याशिवाय  मार्कस स्टॉयनिस आणि रोमारियो शेफर्ड यांचा समावेश आहे. या तिन्ही खेळाडूंना प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळू शकते. त्याशिवाय गोलंदाजीत  आवेश खान याच्यासोबत मार्क वूड वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळेल. तर फिरकी गोलंदाजीची धुरा रवी बिश्नोई याच्या खांद्यावर असेल. रवी बिश्नोई याने गेल्या हंगामात सर्वांनाच प्रभावित केले होते. 


दिल्ली कॅपिटल्स विरोधात लखनौ सुपर जायंट्स संघात कोणते 11 खेळाडू मैदानावर उतरणार ? 
केएल राहुल (कर्णधार), निकोलस पूरन (विकेटकीपर), आयुष बडोनी, दीपक हुड्डा, मार्कस स्टॉयनिस, क्रृणाल पांड्या, रोमारियो शेफर्ड, रवी बिश्नोई, मार्क वूड, आवेश खान, जयदेव उनादकट.