IPL 2023, RCB vs MI : मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यामध्ये रविवारी संध्याकाळी सामना रंगणार आहे, बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे. गेल्या हंगामात मुंबईची कामगिरी निराशाजनक राहिली होती. तर आरसीबीने चांगली कामगिरी करत प्लेऑफमध्ये स्थान पटकावले होते. यंदा दोन्ही संघाला चांगली कामगिरी करण्याचा दबाव असू शकतो. कागदावर दोन्ही संघ संतुलित दिसत आहेत.. 


मुंबई यंदा दमदार कामगिरी करणार का ?


आयपीएल 2022 मध्ये मुंबईची (MI) कामगिरी अत्यंत खराब झाली होती. पण रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाचा या स्पर्धेतील याआधीचा रेकॉर्ड चांगला आहे. पण शेवटचा हंगाम अगदीच खराब होता. मात्र, यावेळी मुंबई संघात काही बदल करुन नक्कीच मैदानात उतरणार आहे. संघाचा अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळणार नाही. त्यामुळे त्यांचे नुकसानही होऊ शकते. या हंगामात मुंबईसाठी स्फोटक फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर या यादीत सूर्यकुमार यादवचे नाव अग्रस्थानी असेल. त्याच्यासोबत कॅमेरून ग्रीन आणि तिलक वर्माही चांगली कामगिरी करू शकतात.


खेळाडू उपल्बध असणार का?


संपूर्ण हंगामात मुंबईचे सर्व खेळाडू उपलब्ध असतील. पण दक्षिण आफ्रिकेचे ट्रिस्टन स्टब्स आणि डेवाल्ड ब्रेविस काही सामने लवकर सोडू शकतात. दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्यात वनडे मालिका खेळवली जाणार आहे. त्यामुळे या दोघांना सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकावे लागू शकते. यावेळी मुंबईचा पहिला सामना बेंगळुरूकडून होणार आहे. हा सामना 2 एप्रिल रोजी होणार आहे. मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचे तर यामध्ये ईशान किशन, कॅमेरून ग्रीन आणि सूर्यकुमार यादव यांची जागा जवळपास निश्चित झाली आहे. रमणदीप सिंग, तिलक वर्मा आणि टीम डेव्हिड हे देखील प्लेइंग इलेव्हनचा भाग असू शकतात. तर गोलंदाजीची धुरा स्टार गोलंदाज जोफ्रा आर्चरवर असू शकते.  


बुमराहच्या अनुपस्थितीत जोफ्रावर जबाबदारी
यंदा मुंबई संघाचा स्टार गोलंदाज बुमराह दुखापतीमुळे बाहेर आहे. त्याच्या अनुपस्थितीत इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरवर मुंबई संघात गोलंदाजीची महत्त्वाची जबाबदारी आहे. बुमराह नसल्यामुळे अडचणीत सापडलेल्या मुंबईच्या चाहत्यांना जोफ्राकडून अपेक्षा आहेत.


गेल्या वर्षी मुंबईची खराब कामगिरी
आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) खराब कामगिरी पाहायला मिळाली होती. मुंबई इंडियन्सच्या संघाचा 14 सामन्यांपैकी 10 सामन्यांमध्ये पराभव झाला होता, तर फक्त चार सामने जिंकता आले होते. आयपीएलच्या 15 सीझनमध्ये मुंबई संघ पहिल्यांदा पॉईट्स टेबलमध्ये खाली होता. मात्र यंदा मुंबई इंडियन्स आयपीएलच्या 16 व्या हंगामात नव्या जोमाने मैदानात उतरणार आहे. 


आरसीबीला यंदा तरी जेतेपद मिळणार का ?
फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये चांगली कामगिरी केली. संघाने पात्रता फेरीपर्यंतचा प्रवास केला होता. पण राजस्थान रॉयल्सकडून पराभूत झाल्यामुळे ते अंतिम फेरीत पोहचू शकले नाहीत. यंदा पुन्हा एकदा संघ दमदार कामगिरीसह पात्रता फेरीपर्यंतचा प्रवास करू शकतो आणि जे गेल्या इतक्या वर्षात झालं नाही ते करुन आयपीएलचा खिताब मिळवू शकतो का? याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे. आरसीबीचा पहिला सामना मुंबई इंडियन्ससोबत आहे.


संतुलित दिसतोय आरसीबीचा संघ -


आयपीएल 2023 मध्ये आरसीबीचा संघ इतर संघाच्या तुलनेत अधिक संतुलित दिसतोय. फाफ डू प्लेसिस, विराट कोहली, फिन एलन, ग्लेन मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिक यासारखे दर्जेदार फलंदाज आहेत. तर गोलंदाजीत हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि जोश हेजलवुड यासराखे गोलंदाज आहेत. त्याशिवाय वानंदु हसरंगा आणि शाहबाज अहमद यांच्यासारखे फिरकीपटू आहेत. आरसीबीने यावेळी संघात बदल केले आहेत. त्यांनी जम्मू-काश्मीरमधील युवा वेगवान गोलंदाज अविनाश सिंग आणि परदेशी खेळाडू रीस टोपले यांचा संघात समावेश केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आरसीबीचा संघ प्लेऑफमध्ये पोहचू शकतो.   


गेल्या हंगामात आरसीबीची कामगिरी कशी ?


2022 मध्ये आरसीबीने प्लेऑफ मध्ये जागा मिळवली होती. फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वात आरसीबीने 14 सामन्यात 8 विजय मिळवले होते तर सहा सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. गतवर्षी आरसीबीचा संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर होता. एलिमिनेटर सामन्यात आरसीबीने लखनौ सुपर जाएंट्स संघाचा 14 धावांनी पराभव केला होता. पण दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून सात विकेटने पराभव स्विकारावा लागला होता. रविवारपासून आरसीबी आपल्या यंदाच्या आयपीएलचा शुभारंभ करणार आहे. आतापर्यंत आरसीबीला एकदाही चषक उंचावता आलेला नाही. पण यंदा केजीएफ आरसीबीला चषक उंचावून देणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.   


आणखी वाचा :


IPL 2023 Match 5 : मुंबईविरोधात आरसीबीचे कोणते 11 धुरंधर उतरणार, पाहा संभावित प्लेईंग 11 


'KGF' यंदा आरसीबीला चॅम्पियन करणार का ?  पाहा 2022 ची कामगिरी 
'दुनिया हिला देंगे हम', मुंबईची पलटन सज्ज! RCB विरोधात कशी असेल मुंबईची प्लेईंग 11?