IPL 2023, KKR vs DC : दिल्लीच्या भेदक माऱ्यासमोर कोलकात्याच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. अक्षर पटेल, कुलदीप यादव, ईशांत शर्मा आणि अनरिख नॉर्खिया यांच्या भेदक गोलंदाजीसमोर कोलकात्याच्या फलंदाजांनी नांगी टाकली. कोलकात्याचा संघ 20 षटकात 127 धावांपर्यंत मजल मारु शकला.  नाणेफेक जिंकून डेविड वॉर्नर यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्लीच्या गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. आंद्रे रसेलने अखेरच्या षटकात तीन षटकार लगावल्यामुळे कोलकाता 127 धावांपर्यंत मजल मारु शकला. दिल्लीला विजायासाठी 128 धावांचे आव्हान देण्यात आलेय. 


जेसन रॉयची एकाकी झुंज - 


एका बाजूला विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला सलामी फलंदाज जेसन रॉय याने संयमी फलंदाजी केली. जेसन रॉय याने 39 चेंडूत 43 धावांचे योगदान दिले. यामध्ये जेसन रॉय याने पाच चौकार आणि एक षटकार लगावला.  जेसन रॉय याने कोलकात्याकडून आज पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यातच जेसन याने एकाकी झुंज दिली. कुलदीप यादव याने जेसन रॉय याला बाद करत दिल्लीला मोठे यश मिळवून दिले. 


कोलकात्याची फलंदाजी ढेपाळली - 


दिल्लीच्या भेदक माऱ्यापुढे कोलकात्याची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. लिटन दास अवघ्या चार धावा काढून तंबूत परतला. त्यानंतर मुंबईत शतक झळकावणारा वेंकटेश अय्यर गोल्डन डकचा शिकार झाला. कर्णधार नीतीश राणा चार धावा काढून ईशांत शार्माच्या गोलंदाजीवर बाद झाला. मनदीप सिंह याचा अडथळा अक्षर पटेलने दूर केला. विस्फोटक रिंकूलाही अक्षर पटेल याने तंबूचा रस्ता दाखवला. सुनी नारायण चार धावा काढून बाद झाला.. अनुकूल रॉय याला भोपळाही फोडता आला नाही. उमेश यादव याला एनरिक नॉर्किया याने झेलबाद केले.  कोलकात्याच्या फलंदाजांना भागिदारी करण्यात अपयश आले. ठरावीक अंतरावर कोलकात्याने विकेट फेकल्या.अखेरच्या षटकात आंद्रे रसेल याने दमदार फलंदाजी केल्यामुळे कोलकाता सन्मानजक धावसंख्यापर्यंत पोहचला. आंद्रे रसेल याने अखेरच्या षटकात लागोपाठ तीन षटकार ठोकत कोलकात्याची धावसंख्या वाढवली. आंद्रे रसेल याने 31 चेंडूत 38 धावांची खेळी केली. या खेळीत रसेलने चार षटकार लगावले. 


दिल्लीचा भेदक मारा, कोलकात्याच्या फलंदाजी फेकल्या विकेट -


कोलकात्याच्या दिग्गज फलंदाजांनी ठरावीक अंतरावर विकेट फेकल्या.  कोलकात्याच्या फंलदाजांना भागिदारी करता आली नाही. कोलकात्याकडून एकही अर्धशतकी भागिदारी झाली नाही. सर्वात मोठी भागिदारी दहाव्या विकेटसाठी झाली. आंद्रे रसेल याने वरुण चक्रवर्तीसोबत कोलकात्याची धावसंख्या वाढवली. दिल्लीकडून ईशांत शर्मा, एनरिख नॉर्किया, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. मुकेश कुमार याला एक विकेट मिळाली.