IPL 2023 CSK vs GT Final: टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स (CSK) नं इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 चा पाचवा खिताब आपल्या नावे केला. पावसामुळे प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर या हंगामाचा निकाल राखीव दिवशी (29 मे) लागला. राखीव दिवशी गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. धोनीच्या चेन्नईसाठी हा सामना जिंकणं तसं मोठं आव्हानच होतं. कारण डकवर्थ लुईस पद्धतीनं सामना खेळवण्यात आला होता. अंतिम सामन्यात अनेक चढ-उतार आले. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात चेन्नईनं गुजरात टायटन्सचा (GT) 5 गडी राखून (डकवर्थ लुईस पद्धतीनं) पराभव केला.


आयपीएलचा अंतिम सामना रविवारी (28 मे) होणार होता, परंतु पावसामुळे सामना रद्द झाला आणि पुढच्या दिवशी म्हणजेच, 29 मे 2023 रोजी सामना खेळवण्यात आला. म्हणजेच हा जेतेपदाचा सामना रिझर्व्ह-डे (29 मे) रोजी झाला. अंतिम सामना पाहण्यासाठी चाहत्यांना दोन दिवस वाट पाहावी लागली. 


गुजरातनं अनेकदा पलटली बाजी, पण तरीही विजयापासून राहिले दूर 


राखीव दिवशीही पावसानं काही पाठ सोडली नाही. गुजरातनं 20 षटकांत 214 धावा केल्या. यानंतर वरुणराजानं बरसण्यास सुरुवात केली. त्यानंतर सामना थांबवण्यात आला. चाहते सामना सुरू होण्याची वाट पाहत होते. अखेर रात्री 12.15 च्या सुमारास सामना सुरू करण्यात आला. चेन्नईचे फलंदाज सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले. डकवर्थ लुईस नियमानुसार चेन्नईला जिंकण्यासाठी केवळ 15 ओव्हर्समध्ये 171 धावा करायच्या होत्या. चेन्नईनं हे आव्हान पेललं आणि गुजरातला पराभूत करून विजय मिळवला. 


धोनीच्या चेन्नईसाठी हा विजय सोपा नव्हता. सामन्यात अनेकदा अशी परिस्थिती आली की, गुजरात याहीवर्षी आयपीएलचा खिताब पटकावेल, असं वाटत होतं. पण धोनीची हुशारी आणि त्यानंतर रवींद्र जाडेजाची खेळी यामुळेच चेन्नईनं विजयाला गवसणी घातली यात काही वादच नाही. जाणून घेऊयात चेन्नईच्या विजयाची 5 महत्त्वाची कारणं... 


धोनी-जाडेजाची हुशारी 


टॉस हरुन गुजरातचा संघ पहिल्यांदा बॅटिंग करण्यासाठी मैदानात उतरला. गुजरातच्या फलंदाजांनी धमाकेदार सुरुवात केली. ओपनिंगमध्ये शुभमन गिल आणि ऋद्धिमान साहानं तुफानी फलंदाजी केली. यावेळी चेन्नईकडून एकदा नाही, तर दोनदा शुभमन गिलला जीवनदान मिळालं. त्यानंतर गिल चेन्नईच्या गोलंदाजांवर अक्षरशः तुटून पडला होता. गिलनं केवळ 19 चेंडूंमध्ये 39 धावा केल्या होत्या. त्यावेळी गुजरातचा स्कोअर एकही विकेट न गमावता 6.5 ओव्हर्समध्ये 67 धावांवर होता. 






इनिंगची 7वी ओवह स्पिनर रवींद्र जाडेजा टाकत होता आणि विकेटच्या मागे धोनी विकेटकिपिंग करत होता. जाडेजाच्या ओव्हरचा सहावा चेंडू टोलवण्यासाठी गिल थोडा पुढे आला, पण शॉर्ट चुकला आणि मग काय? स्टंपच्या मागे उभ्या असलेल्या धोनीनं हुशारी दाखवत गिलला स्टंप आऊट केलं. धोनीनं अचूक वेळ साधत संधीचा फायदा घेतला. शुभमन गिलचा विकेट चेन्नईसाठी खूप महत्त्वाचा ठरला. 


ऋतुराज आणि कॉन्वेची तुफान फटकेबाजी 


डकवर्थ लुईस नियमांमुळे चेन्नईला 15 षटकांत 171 धावांचं लक्ष्य गाठायचं होतं. चेन्नईकडून मैदानात फलंदाजीसाठी सर्वात आधी ऋतुराज गायकवाड आणि डेव्हन कॉन्वे मैदानात उतरले. दोघांनी पहिल्याच चेंडूपासून तुफान फटकेबाजी केली. दोघांनी 39 चेंडूत 74 धावांची सलामीची भागीदारी केली. इथेच चेन्नईच्या विजयाचा पाया रचला गेला. गायकवाडनं 16 चेंडूत 26 तर कॉनवेने 25 चेंडूत 47 धावा केल्या. 


मधल्या फळीकडूनही दमदार कामगिरी


चेन्नईनं 78 धावांत दोन विकेट गमावल्या होत्या. ऋतुराज गायकवाड आणि कॉन्वे हे सलामीवीर पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यानंतर विजयाची जबाबदारी मधल्या फळीकडे होती आणि मधल्या फळीनं ती जबाबदारी तितक्याच सक्षणपणे पेलली. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या शिवम दुबेनं 21 चेंडूत नाबाद 32 धावा केल्या. चौथ्या क्रमांकावर असलेल्या अजिंक्य रहाणेनं 13 चेंडूत 27 धावा केल्या. आपला शेवटचा आयपीएल सामना खेळणारा अंबाती रायुडू पाचव्या क्रमांकावर उतरला असताना त्यानं 8 चेंडूत 19 धावा केल्या. आयपीएलच्या अंतिम सामन्यात चाहत्यांचं लक्ष लागलं होतं धोनीकडे. धोनीच्या षटकाराची चाहते आतुरतेनं वाट पाहत होते. मात्र सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या कर्णधार धोनीला खातंही उघडता आलं नाही. पहिल्याच चेंडूवर धोनी गोल्डन डक झाला आणि माघारी परतला. 


जाडेजाचा बेस्ट फिनिश


धोनीनंतर स्टार फिनिशर रवींद्र जाडेजा सातव्या क्रमांकावर आला. शेवटच्या 2 चेंडूंवर संपूर्ण खेळ पलटवणारा जाडेजा खर्‍या अर्थानं सामन्याचा हिरो ठरला. दरम्यान, हा सामना शेवटच्या षटकात खूपच रंगतदार वळणावर येऊन ठेपला होता. शेवटच्या षटकात चेन्नई आणि गुजरातच्या चाहत्यांनी श्वास रोखला होता. चेन्नईला विजयासाठी 10 धावांची गरज होती आणि स्ट्राईकवर होता, स्टार फिनिशर सर जाडेजा. गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहित शर्माच्या चेंडूवर जाडेजानं सर्वात आधी षटकार लगावला. यानंतर शेवटच्या चेंडूनवर विजयी चौकार लगावत जाडेजानं बेस्ट फिनिश केलं. जाडेजानं 6 चेंडूत नाबाद 15 धावा केल्या.  


संपूर्ण हंगामात गुजरातच्या राशिद, शामीचाच बोलबाला 


यंदा आयपीएलच्या संपूर्ण हंगामात गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीनं 17 सामन्यात सर्वाधिक 28 विकेट्स घेतल्या आणि तो पर्पल कॅपचा विजेता ठरला. त्याच्याशिवाय अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खान आणि वेगवान गोलंदाज मोहित शर्मानंही 27-27 विकेट्स घेतल्या. हे तिनही गोलंदाज गुजरातचे आहेत. पण धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा संघही त्यांच्याविरुद्ध पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरला.


या सामन्यात चेन्नईनं शामी आणि राशिदला एकही विकेट दिली नाही. मोहितला 3 विकेट घेण्यात यश आलं असलं तरीही गुजरातला धोनीकडून विजय हिरावून घेता आला नाही. शामीनं 3 षटकांत 29 आणि राशिदनं 3 षटकांत 44 धावा दिल्या. या सामन्यात नूर अहमदनं 17 धावांत 2 विकेट्स घेतले. 


चेन्नईचा विजय, गुजरातचा पराभव 


आयपीएलच्या अंतिम सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर सर्वात आधी फलंदाजी करताना गुजरात संघानं 4 गडी गमावून 214 धावा केल्या. साई सुदर्शननं संघासाठी 47 चेंडूत 96 धावांची तुफानी खेळी केली. त्यानं 6 षटकार आणि 8 चौकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट 204.25 होता. सुदर्शनशिवाय ऋद्धिमान साहानं 54 आणि शुभमन गिलनं 39 धावा केल्या. चेन्नईकडून मथिशा पाथिरानानं 2 विकेट्स घेतले. 


चेन्नईनं 215 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला सुरुवात केलीच होती की, पहिल्याच षटकात पाऊस आला आणि सामना थांबवावा लागला. यानंतर जेव्हा सामना सुरू झाला तेव्हा सामना 15 षटकांचा खेळवण्यात आला. तसेच डकवर्थ लुईस नियमानुसार, चेन्नईला 171 धावांचं लक्ष्य मिळालं होतं. प्रत्युत्तरात चेन्नईनं 5 गडी गमावून सामना जिंकून आयपीएलचं जेतेपद पटकावलं.