Mitchell Marsh Delhi Capitals IPL 2023 : आयपीएलच्या सोळाव्या हंगामात दिल्लीच्या संघाला लागोपाठ दोन पराभवाचा सामना करावा लागलाय. डेविड वॉर्नरच्या नेतृत्वातील दिल्ली संघ अद्याप पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. ऋषभ पंतची अनुपस्थितीती दिल्ली संघाला प्रक्रशाने जाणवत आहे. आधीच अडचणीत सापडलेल्या दिल्लीच्या संघाच्या अडचणीत आणखी वाढ झाली. दिल्लीचा घातक फलंदाज मिचेल मार्श पुढील काही दिवस अनुपलब्ध असेल. मिचेल मार्श ऑस्ट्रेलियाला रावाना झालाय. तो पुढील काही सामन्यासाठी उपलब्ध नसेल.   


मिळालेल्या माहितीनुसार, मिचेल मार्श लग्नासाठी एक आठवड्याच्या सुट्टीवर आहेत. तो ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. पुढील तीन सामन्यासाठी तो आयपीएलमध्ये खेळणार नाही. दिल्लीकडे रोवमन पॉवेल याचा पर्याय उपलब्ध आहे. तो गोलंदाजी आणि फलंदाजीत प्रभावी कामगिरी करु शकतो. 


आतापर्यंत दिल्लीला दोन्ही सामन्यात निराशा पदरी पडली आहे. या हंगामातील दोन्ही सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या दोन्ही सामन्याच मिचेल मार्श याची कामगिरीही लौकिकास साजेशी राहिली नाही. लखनौविरोधात मिचेल मार्शला खातेही उघडता आले नाही. तर गुजरातविरोधात फक्त चार धावाच काढता आल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भन्नाट फॉर्मात असलेला मार्श आयपीएलमध्ये सुपरफ्लॉप ठरत असल्याचे दिसतेय. 


दिल्लीची निराशाजनक कामगिरी  


आयपीएलच्या सोळाव्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी अतिशय निराशाजनक राहिली आहे. दोन्ही सामन्यात दिल्लीचा पराभव झालाय. गुजरात आणि लखनौ यांच्याविरोधात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. लखनौने दिल्लीचा 50 धावांनी पराभव केला होता. तर गुजरातविरोधात झालेल्या रोमांचक सामन्यात सहा विकेटने पराभव झाला होता. गुणतालिकेतही दिल्लीचा संघ तळाशी आहे. दिल्ली गुण तालिकेत आठव्या क्रमांकावर आहे, नेट रनरेटही - 1.703 इतका आहे. प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी दिल्लीच्या संघाला पुढील काही सामन्यात चांगली कामगिरी करावी लागणार आहे.