IPL 2023, PBKS vs DC :  रायली रुसो याचे वादळी अर्थशतकाच्या जोरावर दिल्लीने दोन विकेटच्या मोबदल्यात 213 धावांचा डोंगर उभारला. पृथ्वी शॉ यानेही झंझावाती 54 धावांची खेळी केली. त्याशिवाय डेविड वॉर्नर आणि फिल साल्ट यांनी मोलाचे योगदान दिले. पंजाबकडून सॅम करन याने दोन विकेट घेतल्या. पंजाबला विजयासाठी 214 धावांचे आव्हान आहे.


धर्मशाला मैदानावर पंजाबने नाणेफेक जिंकून दिल्लीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पण दिल्लीच्या फलंदाजांनी शिखर धवनचा हा निर्णय चुकीचा ठरवला.  दिल्लीच्या सलामी फलंदाजांनी वादळी सुरुवात केली.  संघात पुनरागमन करणारा पृथ्वी शॉ लयीत दिसत होता. पृथ्वी शॉ आणि कर्णधार डेविड वॉर्नर यांनी दमदार सुरुवात केली. डेविड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ यांनी पहिल्या विकेटसाटी 62 चेंडूत 94 धावांची भागिदारी केली. पृथ्वी शॉ याने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली.. तर दुसरीकडे डेविड वॉर्नर याने धावांचा पाऊस पाडला. डेविड वॉर्नर याने 31 चेंडूत 46 धावांची खेळी केली. या खेळीत वॉर्नरने दोन षटकार आणि पाच चौकार लगावले. 



डेविड वॉर्नर बाद झाल्यानंतर पृथ्वी शॉ याने रायली रुसो याच्यासोबत वादळी फलंदाजी केली. दोघांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. खासकरुन रुसो याने झंझावाती फलंदाजी केली. पृथ्वी शॉ आणि रुसो यांनी दुसऱ्या विकेटसाठी 28 चेंडूत 54 धावांची भागिदारी केली. यामध्ये रुसो याने 45 धावांचा पाऊस पाडला. पृथ्वी शॉ 54 धावांवर बाद झाला. पृथ्वीने या खेळीत एक षटकार आणि सात चौकार लगावले. पृथ्वी याने दमदार पुनरागमन केले. यंदाच्या हंगामात पृथ्वीला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नव्हती. तो वारंवार अपयशी ठरत होता. सततच्या खराब कामगिरीमुळे त्याला संघाबाहेरही बसवले होते. पण आज दिल्लीच्या संघात पृथ्वीला संधी मिळाली. पृथ्वी शॉ याने दमदार पुनरागमन करत अर्धशतक झळकावले. 


पृथ्वी शॉ बाद झाल्यानंतर रायली रुसो आणि फिल साल्ट यांनी वादळी फलंदाजी करत दिल्लीला मोठी धावसंख्या उभारुन दिली. रुसो आणि फिल साल्ट यांनी अर्धशतकी भागिदारी करत दिल्लीचा डाव 200 धावंच्या पुढे नेहला. रायली रुसो याने नाबाद 82 धावांची खेळी केली. तर फिल साल्ट याने नाबाद 26 धावांचे योगदान दिले. फिल साल्ट आणि रायली रुसो यांनी तिसऱ्या विकेटसाठी 30 चेंडूत 65 धावांची भागिदारी केली. साल्ट याने 14 चेंडूत दोन षटकार आणि दोन चौकाराच्या मदतीने 26 धावांचे योगदान दिले. तर रायली रुसो याने 37 चेंडूत 82 धावांचा पाऊस पाडला.  या वादळी खेळीत रुसो याने सहा षटकार आणि सहा चौकार मारले.



पंजाबकडून सॅम करन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने दोन विकेट घेतल्या. सॅम करन याच्याशिवाय एकाही गोलंदाजाला विकेट घेता आली नाही. कगिसो रबाडा, अर्शदीप सिंह, नॅथन एलिस, राहुल चहर आणि हरप्रीत ब्रार यांची विकेटची पाटी कोरीच राहिली. हरप्रीत ब्रार याला 13 च्या सरासरीने धावा कुटल्या.. तर रबाडा आणि एलिसहेही महागडे ठरले.