Tushar Deshpande wears the Purple Cap IPL 2023  : थरारक लढतीत पंजाबने चेन्नईनाचा चार विकेटने पराभव केला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारात पंजाबने बाजी मारली. मोहम्मद सिराज याच्या डोक्यावरील पर्पल कॅप आधी अर्शदीप सिंह याने हिसकावली. त्यानंतर चेन्नईच्या तुषार देशपांडे यानेपर्पल कॅप आपल्या डोक्यावर ठेवली. मराठमोळ्या तुषार देशपांडे याने पंजाबच्या तीन फलंदाजांना बाद करत पर्पल कॅपवर कब्जा मिळवला. प्रथम गोलंदाजी करताना आधी अर्शदीप याने एक विकेट घेत सिराजकडून पर्पल कॅप हिसकावली. पण त्याचा आनंद फारकाळ टिकला नाही. दुसऱ्या डावात गोलंदाजी करणाऱ्या तुषार देशपांडे याने तीन विकेट घेत पर्पल कॅप मिळवली. मराठमोळ्या तुषार देशपांडे याने चार षटकात 49 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. 


पर्पल कॅपच्या स्पर्धेत तुषार आघाडीवर - 
सध्या पर्पल कॅप तुषार देशपांडे (Tushar Deshpande) याच्या डोक्यावर आहे. तुषार देशपांडे याने 9 सामन्यात 17 विकेट घेतल्या आहेत. तर अर्शदीप सिंह याने 9 सामन्यात 15 विकेट घेतल्या आहेत. मोहम्मद सिराज याने आठ सामन्यात 14 विकेट घेतल्या आहेत. राशिद खान यानेही 8 सामन्यात 14 विकेट घेतल्या आहेत. रविंद्र जाडेजा याने 13 विकेट घेतल्या आहेत. शमी आणि वरुण चक्रवर्तीच्या नावावर प्रत्येकी 13 विकेट आहेत. तर चहलच्या नावावर 12 विकेट आहेत.  






ऑरेंज कॅप स्पर्धेत कॉनवेची मोठी झेप - 


पंजाबविरोधात नाबाद 92 धावांची खेळी करत डेवेन कॉनवे याने मोठी झेप घेतली आहे. कॉनवे याने 400 धावांचा पल्ला पार केला. डेवेन कॉनवे सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजात दुसऱ्या क्रमांकावर आहे. आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस याने आठ सामन्यात 422 धावा केल्या आहेत.. डेवेन कॉनवे याने 9 सामन्यात 414 धावा चोपल्या आहेत. ऋतुराज गायकवाड याच्या नावावर 9 सामन्यात 354 धावा आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असणारा विराट कोहली चौथ्या क्रमांकावर घसरलाय. विराट कोहलीच्या नावावर  333 धावा आहेत. शुभमन गिल याच्या नावावही 333 धावांची नोंद आहे. यशस्वी जायस्वाल याने 9 सामन्यात 304 धावा केल्या आहेत. यशस्वी जायस्वाल मुंबईविरोधात वानखेडेवर धावांचा पाऊस पाडत आहे. सध्या त्याने अर्धशतकी खेळी करत ऋतुराज गायकवाड याला मागे टाकलेय.