IPL 2023, Chennai Super Kings Injuries : चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघातील खेळाडू एकापाठोपाठ एक दुखापतग्रस्त होत आहेत. आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला सुरुवात होण्याआधी काही खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते. त्यानंतर आता काही खेळाडू दुखापतीमुळे काही सामन्याला मुकत आहे. या यादीत एमएस धोनी याच्या नावाचाही समावेश झाला आहे. राजस्थानविरोधात धोनीची दुखापत समोर आली होती. दुखापत असताना धोनीने राजस्थानविरोधात विस्फोटक खेळी केली. धोनीची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत अद्याप कोणताही माहिती समोर आलेली नाही. पण धोनीशिवाय आणखी एक खेळाडू दुखापतीमुळे दोन आठवडे आयपीएलला मुकणार आहे.  


CSK चा हेड कोच स्टीफन फ्लेमिंग याने राजस्थान रॉयल्सविरोधातील सामन्यानंतर धोनीच्या दुखापतीबद्दलची माहिती दिली. फ्लेमिंग म्हणाला की,  'धोनीच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. दुखापतीमुळे धोनीला त्रास होत होता, तरिही राजस्थानविरोधात त्याने फलंदाजी केली. धोनी दुखापतीनंतरही चेन्नईच्या संघाचे नेतृत्व करत आहे. हा आयपीएल हंगाम धोनीचा अखेरचा असू शकतो. त्यामुळे तो दुखापत असतानाही तो खेळण्याची रिस्क घेऊ शकतो. धोनीची दुखापत इतकी गंभीर नाही. 


सिसांदा मंगाला दुखापतग्रस्त - 


चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज सिसांदा मंगाला दुखापतग्रस्त झाला. राजस्थान रॉयल्सच्या विरोधात झेल घेताना मंगाला याच्या हाताला दुखापत झाली. त्यामुळे या सामन्यात तो फक्त दोन षटकेच गोलंदाजी करु शकला. तो दोन आठवड्यापर्यंत चेन्नईच्या प्लेईंग 11 चा भाग नसेल.






दीपक चाहर तीन आठवडे आयपीएलमधून बाहेर


CSK चा स्टार अष्टपैलू खेळाडू दीपक चाहर याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. मुंबई इंडियन्सविरोधातील सामन्यात त्याला हा त्रास जाणवला होता. तेव्हापासून तो प्लेईं11 चा भाग नाही. तो तीन आठवडे आयपीएलला मुकणार आहे.  


बेन स्टोक्सलाही दुखापत 


इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सही दुखापतग्रस्त झालाय. मागील दोन सामन्यात दोन चेन्नईच्या प्लेईंग 11 चा भाग नव्हता. अंगठ्याच्या दुखापतीमुळे स्टोक्स काही सामन्याला मुकणार आहे.  स्टोक्सची दुखापत तितकी गंभीर नाही, त्यामुळे तो लवकरच संघात पुनरागमन करेल.. पण तो गोलंदाजी करण्याची शक्यता कमीच आहे.


दुखापतीमुळे हे खेळाडू आधीच बाहेर - 


गेल्या हंगामात दमदार कामगिरी करणारा मुकेश चौधरी याआधीच दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर गेलाय. त्याशिवाय न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज कायल जेमिसन याने दुखापतीमुळे आयपीएलमधून माघार घेतली आहे. सिमरजीत सिंह हाही दुखापतग्रस्त असल्यामुळे आयपीएलमधून बाहेर आहे.