CSK vs GT, 1 Innings Highlight: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडच्या विस्फोटक अर्धशतकाच्या बळावर चेन्नईने सात विकेटच्या मोबद्लायत 178 धावा केल्या. ऋतुराज गायकवाड याने 92 धावांची खेळी केली. तर धोनीने अखेरच्या षटकात चौकार आणि षटकार लगावले. धोनीने 7 चेंडूत 14 धावांचे योगदान दिलेय. गुजरातकडून मोहम्मद शामी, राशिद खान आणि अल्जारी जोसेफ यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. गुजरातला विजयासाठी 20 षटकात 179 धावांची गरज आहे. 


ऋतुराजचा वन मॅन शो - 


एका बाजूला विकेट पडत असताना मराठमोळ्या ऋतुराज गायकवाड याने गुजरातच्या गोलंदाजांची धुलाई केली. ऋतुराज गायकवाड याने 50 चेंडूत 92 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान ऋतुराज गायकवाड याने 9 षटकार आणि चार चौकार लगावले. अल्जारी जोसेफ याने धोकादायक ऋतुराजला बाद केले. ऋतुराज गायकवाड याच्या खेळीच्या बळावर चेन्नईने सन्मानजनक धावसंख्या उभारली. 


जाडेजा, रायडू, कॉनवे अन् स्टोक्सचा फ्लॉप शो - 


इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघाकडून खेळत आहे. चेन्नईने कोट्यवधींची बोली लावत स्टोक्सला ताफ्यात घेतले. पण पहिल्याच सामन्यात स्टोक्सला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. स्टोक्स अवध्या सात धावा काढून बाद झाला. सहा चेंडूत एका चौकाराच्या मदतीने सात धावा केल्या.  स्टोक्सला राशिद खान याने बाद केले. स्टोक्सशिवाय अंबाती रायडूलाही मोठी खेळी करण्यात अपयश आले. रायडूला फक्त 12 धावा करता आल्या. यामध्ये त्याने एक षटकार लगावला. तर कॉनवे याला एक धाव करता आली. कॉनवे शामीचा शिकार झाला. सहा चेंडूत कॉनवेला एक धाव करता आली. जाडेजालाही मोठी खेळी करता आली नाही. जाडेजा अवघी एक धाव काढून बाद झाला.


चांगल्या सुरुवातीनंतर मोईन झाला बाद - 


कॉनवे स्वस्तात माघारी परतल्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि मोईन अली यांनी चेन्नईचा डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी चांगली भागिदारी केली. पण ही जोडी राशिद खान याने तोडली. राशिद खान याने मोईन अलीला बाद केले. मोईन अलीला चांगली सुरुवात मिळाली होती. मोईन अली याने 17 चेंडूत 23 धावांचे योगदान दिले. यादमर्यान त्याने चार चौकार आणि एक षटकार लगावला. 


नाणेफेकीचा कौल हार्दिकच्या बाजूने - 


गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या काही षटकात गुजरातने चेन्नईच्या फलंदाजांना धावा काढू दिल्या नाहीत. दोन षटकात फक्त दोन धावा करता आल्या होत्या. पण त्यानंतर ऋतुराज गायकवाड याने फटकेबाजी केली.


शामीचे बळीचे शतक - 


गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी याने चेन्नईचा सलामी फलंदाज डेवन कॉनवे याला बाद करत खास विक्रम केला. शामीचा चेंडू कॉनवेला समजला नाही. या विकेटसह शामीने आयपीएलमध्ये 100 विकेट घेण्याचा पराक्रम केला. मोहम्मद शामीने आयपीएमलमधील पहिली विकेट क्लिन बोल्डच्या स्वरुपात घेतली होती. तर 50 वी आणि 100 विकेटही त्याने अशीच घेतली. 


आयपीएलची दिमाखात सुरुवात -


अरिजीत सिंह याने आपल्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. तर रश्मिका मंधाना आणि तमन्ना भाटिया यांच्या डान्सवर उपस्थित प्रेक्षक थिरकले. कलाकारांच्या दमदार परफॉर्मनंतर आयपीएलच्या 16 व्या हंगामाला सुरुवात झाली. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या याने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  


पांड्याची ग्रँड एन्ट्री -


ओपनिंग सरेमनीमधील परफॉर्मन्स झाल्यानंतर स्टेजवर बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शाह आणि आयपीएल चेअरमन अरुण सिंह धूमाल आले होते. त्याशिवाय चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी आणि गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या यांनाही स्टेजवर आमंत्रित करण्यात आले. हार्दिक पांड्याची ग्रँड एन्ट्री झाली. पांड्या छोट्या कारमधून स्टेजवर आला होता. त्यावेळी त्याच्या हातात आयपीएलची ट्रॉफी होती.