IPL 2022 : दिल्लीचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याने आयपीएलमधील सुरुवातीच्या सामन्यात आपली छाप पाडली आहे. कुलदीपच्या गोलंदाजीपुढे फंलदाजांचा टिकाव लागत नाही. एकापेक्षा एक दर्जेदार गोलंदाज कुलदीपपुढे गुडघे टेकत आहेत. त्यामुळे कुलदीप यादवचं भारतीय संघात पुनरागमन होणार का? याची चर्चा सुरु झाली आहे. चायनामन गोलंदाज कुलदीप यादव मागील काही वर्षांपासून भारतीय संघाबाहेर आहे. खराब फॉर्म आणि दुखापतीमुळे कुलदीपला भारतीय संघातील जागा गमावावी लागली होती. त्यातच कोलकाताकडून कुलदीपला संधी मिळत नव्हती. पण आयपीएलच्या 15 व्या हंगमासाठी दिल्लीने कुलदीपला खरेदी केले अन् संघात संधी दिली. त्यानंतर कुलदीप यादव याने पुन्हा एकदा आपला जलवा दाखवण्यास सुरुवात केली आहे. कुलदीपची गोलंदाजी पाहून भारतीय संघातील त्याच्या स्थानाबाबत चर्चा सुरु झाली आहे. यावरच भारतीय संघाचे माजी खेळाडू सुनील गावसकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कुलदीप यादवने कोलकाताविरोधात चार विकेट घेत दिल्लीच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. याच वर्षी टी 20 विश्वचषक होणार आहे. त्यामुळे कुलदीपचं भारतीय संघात पुनरागमन होणार का? यावर चर्चा सुरु झाली आहे. याबाबत बोलताना सुनील गावसकर म्हणाले की,' टी 20मध्ये तुम्ही चार विकेट घेतल्या, याचाच अर्थ तुम्ही चांगली गोलंदाजी केली आहे. कुलदीप यादवने मोक्याच्या क्षणी चार विकेट घेतल्या आहे. कुलदीपची भेदक गोलंदाजी पाहाता भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता वाढली आहे.कुलदीपची गुगली अनेक फलंदाजांना समजत नाही. सध्या कुलदीप दर्जेदार गोलंदाजी करत आहे. कुलदीप याआधी संथ गोलंदाजी करत होता. पण आता त्याने गोलंदाजीत बरीच सुधारणा केली आहे. तो चेंडूला वेग देत आहे. त्यामुळे कुलदीपची गोलंदाजी खेळणं कठीण आहे. '
भारतीय संघाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवची गोलंदाजी खेळणं प्रत्येक फलंदाजाला कठीण जाते. टी20 फॉर्मेटमध्ये कुलदीप घातक गोलंदाज आहे. कारण कुलदीपची गुगली अनेकांना समजत नाही. कोलकाताविरोधातील त्याची गोलंदाजी पाहाता लवकरच तो भारतीय संघात पुनरागमन करेल असं वाटतेय. 15 व्या हंगमापूर्वी कुलदीप यादवला दिल्लीने दोन कोटी रुपयांत खरेदी केले होते. दिल्लीचा हा निर्णय योग्य असल्याचं दिसत आहे. आतापर्यंत कुलदीपने धारधार गोलंदाजी केली आहे.