IPL 2022 Playoffs : अखेरच्या साखळी सामन्यात संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान संघाने चेन्नईचा पाच गड्यांनी पराभव केला. या विजयासह राजस्थान संघाने गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. राजस्थान आणि लखनौ या दोन्ही संघाचे 18 समान गुण आहेत. पण सरस नेटरनरेटच्या जोरावर राजस्थान संघाने दुसऱ्या स्थानावर कब्जा केला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघ 20 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. गुजरात, राजस्थान आणि लखनौ या तीन संघाचा प्लेऑफमधील प्रवेश निश्चित झालाय. 


क्वालिफायर 1 मध्ये गुजरात-राजस्थानचा सामना - 
24 मे रोजी गुणतालिकेतील पहिल्या दोन क्रमांकावरील संघामध्ये क्वालिफायर 1 चा सामना होणार आहे. गुजरात आणि राजस्थान यांच्यामध्ये क्वालिफायरचा एकचा सामना होणार आहे. विजेता संघ थेट फायनलमध्ये पोहचणार आहे. तर पराभूत झालेला संघ क्वालिफायर 2 मध्ये पोहचणार आहे. त्यामुळे अव्वल दोन संघाला एक अतिरिक्त संधी मिळणार आहे. 


लखनौबरोबर कोण भिडणार, मुंबईच्या हातात-
राहुलच्या नेतृत्वातील लखनौचा संघ सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांचा सामना आरसीबी अथवा दिल्ली या दोन्ही संघापैकी एका संघाबरोबर होणार आहे. शनिवारी मुंबई आणि दिल्ली यांच्यातील सामन्यानंतर चौथ्या क्रमांकाचा संघ ठरणार आहे. मुंबईने दिल्लीचा पराभव केल्यास लखनौ आणि आरसीबीमध्ये एलिमिनेटरचा सामना होणार आहे. जर दिल्ली जिंकल्यास त्यांचा लखनौबरोबर सामना होईल. हा सामना 25 मे रोजी खेळवला जाणार आहे. 


प्लेऑफचं वेळापत्रक - 
क्वालिफायर 1:  गुजरात vs राजस्थान, 24 मे - कोलकाता   
एलिमिनेटर:  लखनौ vs आरसीबी/दिल्ली, 25 मे - कोलकाता
क्वालिफायर 2 - 27 मे - अहमदाबाद
फायनल: 29 मे  - अहमदाबाद


प्लेऑफ आणि अंतिम सामन्यासाठी संघ कसे पात्र ठरतील?
गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. पहिल्या दोन संघामध्ये क्वालिफायर - 1 चा (Qualifier 1) सामना होणार आहे. यातून विजेता संघ अंतिम फेरीत धडक मारणार आहे. तर पराभूत संघांचा सामना क्वालिफायर 2 मध्ये होईल. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील संघामध्ये एलिमिनेटर 1 (Eliminator 1) मध्ये सामना होणार आहे. यातून विजेता संघ क्वालिफायर 2 मध्ये जाईल. क्वालिफायर - 1 मधील पराभूत संघ आणि एलिमिनेटर 1 मधील विजेत्या संघामध्ये क्वालिफायर 2 मध्ये सामना होणार आहे. यामधील विजेता संघ अंतिम फेरीत धडक मारेल. 


पाच संघाचं आव्हान संपलं - 
आयपीएलमधील सर्वात यशस्वी असलेल्या मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि हैदराबाद या संघाचे प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात आलेय. तसेच पंजाबचाही गाशा गुंडाळलाय. पंजाबचा अपवाद वगळता प्रत्येक संघाने आयपीएल चषक उंचावलाय. मुंबईने पाच तर चेन्नईने चार वेळा आयपीएल चषक उंचावलाय. कोलकाताने दोन वेळा आयपीएल चषकावर नाव कोरलेय. हैदराबाद संघ 2016 मध्ये विजेता झाला होता.. यंदा आयपीएलला नवीन विजेता मिळणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. 


मुंबईच्या हातात आरसीबीचं नशीब - 
21 मे रोजी शनिवारी मुंबई आणि दिल्ली आपला अखेरचा साखळी सामना खेळणार आहेत. या सामन्याकडे आरसीबीच्या चाहत्यांचेही लक्ष असणार आहे. कारण, या सामन्यावर आरसीबीचं प्लेऑफचा प्रवेश ठरणार आहे. अखेरच्या लीग सामन्यात मुंबईने दिल्लीचा पराभव केल्यास आरसीबीचा सरळ प्लेऑफमध्ये प्रवेश होईल... पण जर दिल्लीने मुंबईवर विजय मिळवल्यास आरसीबीचे आव्हान संपुष्टात येईल.. मुंबईचा पराभव झाल्यास आरसीबी आणि दिल्ली यांचे 16 गुण होतील. पण दिल्लीचा नेट रनरेट दिल्लीपेक्षा चांगला आहे. त्यामुळे नेटरनरेटच्या आधारावर दिल्लीला प्लेऑफमध्ये स्थान मिळेल. आरसीबीचा नेटरनरेट -253 इतका आहे तर दिल्लीचा नेटरनरेट + 225 इतका आहे.