IPL 2022 :  आयपीएलच्या 15 व्या हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरी खूपच निराशजनक झाली. सलग सहा सामन्यात मुंबईचा पराभव झाला. शनिवारी झालेल्या सामन्यात लखनौनं मुंबईचा 18 धावांनी पराभव केला. लखनौनं दिलेल्या 200 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करता मुंबईचा संघ 181 धावांपर्यंत मजल मारु शकला. सहाव्या पराभवानंतर मुंबईची प्ले ऑफमध्ये पोहचण्याची संधी धूसर झाली आहे. यंदाच्या हंगमात मुंबईची कामगिरी निराशाजनक झाली आहे. लखनौविरोधातील सामन्यानंतर रोहित शर्मा निराश असल्याचे दिसत होतं. रोहित शर्माने आपली नाराजी बोलून दाखवली. मुंबईची नेमकी चूक काय झाली? याचं स्पष्टीकरण दिले. 


एखाद्या विशिष्ट परिस्थितीचे वर्णन करणे कठीण आहे. जेव्हा आपण मोठ्या लक्षाचा पाठलाग करत असतो, तेव्हा भागिदारी होणं गरजेचं असते. आम्हाला एकही मोठी भागिदारी करता आली नाही. यात अपयश आले, याचे काही खास कारण नाही. बुमराहला इतर गोलंदाजांची चांगली साथ मिळाली नाही, त्यामुळे धावा रोखण्यात अपयश आले. इतर गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करण्याची गरज आहे. टी 20 चा खेळ फक्त कोणत्याही एका षटकात बलदू शकतो. सर्वश्रेष्ठ प्लेईंग 11 खेळवण्याचा प्रयत्न करत असतो. आम्ही आतापर्यंत सहा सामने गमावले आहेत. आम्ही बेस्ट प्लेईंग 11 कोणती असेल, याची पडताळणी करत आहोत. पराभव झाल्यानंतर संघात बदल करत आहोत, हे सांगणं सोपं असते, पण सर्वोत्कृष्ट प्लेईंग 11 निवडण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असे रोहित शर्मा म्हणाला.  


केएल राहुलने दमदार फलंदाजी केली. आमच्या संघात काही कमतरता आहे. आघाडीच्या चार फलंदाजापैकी एकाने मोठी खेळी करायला हवी. पण सध्या तसे होत नाही. आम्ही आतापर्यंत एकही सामना जिंकलो नाही, पण उर्वरित सामन्यात जिंकण्याचा प्रयत्न करु. जिंकण्याचा आम्ही प्रयत्न करु. आम्ही पुनरगामनाचा प्रयत्न करु, असे रोहित शर्मा म्हणाला.  


MI vs LSG 10 महत्त्वाचे मुद्दे-



  1. सामन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाणेफेक. नाणेफेक जिंकणारा संघ सामनाही जिंकतो असंच समीकरण झालं आहे. पण आज मुंबईने प्रथम गोलंदाजी घेऊनही त्यांना पराभव पत्करावा लागला. याचे कारण लखनौचा दमदार खेळ ठरला. 

  2. सामन्याबद्दल बोलायचं झालं तर पाहता क्षणी समोर येणारी गोष्ट म्हणजे केएल राहुलचं दमदार शतक. मुंबईची प्रथम गोलंदाजी असताना देखील राहुलने ठोकलेल्या शतकामुळे मुंबईसमोर 200 धावांचे लक्ष्य होते. राहुलने 60 चेंडूत 9 चौकार आणि 5 षटकार ठोकत नाबाद 103 धावा केल्या.

  3. सामन्यात राहुलने डि कॉकसह चांगली सुरुवात केली. पण डि कॉक बाद होताच संघावर प्रेशर आलं. पण याचवेळी राहुलसोबत मयांकने एक उत्तम भागिदारी रचली. ही भागिदारी संघासाठी महत्त्वाची ठरली.

  4. मुंबईकडून गोलंदाजीत खास कामगिरी झाली नसून आज एक महत्त्वाची गोष्ट पाहायला मिळाली, ती म्हणजे मोठ्या प्रमाणात झालेली मिसफिल्ड.

  5. मुंबईचे गोलंदाज खराब कामगिरी करतच होते. त्यात मुंबईने मोठ्या विश्वासाने संघात घेतलेल्या इंग्लंडच्या टायमल मिल्सच्या गोलंदाजीवर आज तुफान फटकेबाजी झाली. त्याला तीन षटकात 54 धावा आल्या.

  6. केवळ बुमरहाने 24 चेंडूत 24 धावा देत दिल्या. विकेट्सचा विचार करता उनडकटने दोन, मुरगन आणि फेबियन एलनने प्रत्येकी एक विकेट घेतली.

  7. त्यानंतर दुसऱ्या इनिंगचा विचार करता, 200 धावांचे आव्हान पार करताना मुंबईचे सलामीवीर आजही फेल झाले. रोहित सहा तर ईशान 13 धावाच करु शकला.

  8. संघ अडचणीत असताना तिलक आणि सूर्यकुमारने एक चांगली भागिदारी रचली. पण ते संघाला विजयापर्यंत घेऊन जाऊ शकले नाहीत. तिलक 26 आणि त्यानंतर सूर्यकुमार 37 धावा करुन तंबूत परतला

  9. अखेरच्या काही षटकात पोलार्डने विजय मिळवून देण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केले. पण त्याची 25 धावांची खेळी मुंबईला विजय मिळवून देऊ शकली नाही.

  10. सामन्यात मुंबईची फलंदाजी तर सुमार पाहायला मिळालीच, पण गोलंदाजीमधील अडचणी पुन्हा दिसून आल्या. बुमराहच्या जोडीला एकही चांगल्या फॉर्ममधील गोलंदाज नसल्याने आज मुंबई पराभूत झाली असे म्हणता येईल.