IPL 2022, GT vs LSG : आयपीएलच्या हंगामात यंदा नव्याने सामिल झालेल्या गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपरजायंट्स (GT vs LSG) या दोन संघामध्ये आज लढत पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ यंदा पहिल्यांदाच आयपीएलमध्ये सामिल झाले असून आज त्यांचा पहिलाच सामना आहे. गुजरात संघाची कमान विस्फोटक ऑलराउंडर हार्दिक पंड्याकडे तर लखनौची जबाबदारी केएल राहुलकडे असणार आहे. आयपीएलच्या महालिलावात या दोन्ही संघानी अनेक महागड्या खेळाडूंवर पैशांची बरसात करत त्यांना ताफ्यात सामिल केले आहे. तर अशा नेमक्या कोणत्या खेळाडूंवर आज सर्वांची नजर असणार आहे, ते पाहुया... 


1. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या बऱ्याच काळानंतर मैदानावर उतरणार आहे. मागील वर्षीच्या टी-20 विश्वचषकानंतर फिटनेसच्या समस्येमुळे हार्दीक मैदानाबाहेरच आहे. पण यंदाच्या आयपीएलमधून तो पुन्हा एकदा पुनरागमन करत आहे. मागील आयपीएलमध्ये त्याने 12 सामन्यात केवळ 127 रन केले होते तर फिटनेसच्या समस्येमुळे गोलंदाजी केलीच नव्हती. त्यामुळे यंदा तो काय कामगिरी करतो ते पाहावे लागेल.


2. यानंतर गुजरातचा आणखी एक खेळाडू म्हणजे जगातील अव्वल दर्जाचा फिरकीपटू राशिद खान. यंदा गुजरातमध्ये सामिल झालेला राशिद दरवर्षीप्रमाणे चमकदार कामगिरी करतो का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. मागील सीजनमध्ये त्याने हैदराबादकडून 14 सामन्यात 18 विकेट्स घेतल्या होत्या. तसंच तो फलंदाजीमध्येही अनेकदा चमक दाखवतो.


3. युवा खेळाडू शुभमन गिल देखील यंदा गुजरात संघाचा हिस्सा झाला असून अनेकवर्षे केकेआरकडून खेळल्यानंतर आता गुजरातकडून शुभमन काय कमाल करतो हे पाहावे लागेल. मागील आयपीएलमध्ये त्याने 17 सामन्यात 478 धावांचा पाऊस पाडला होता. यंदा तो गुजरातकडून सलामीला येत काय कमाल करणार, याकडे क्रिकेटजगताचे लक्ष आहे. 


4. लखनौ सुपरजायंट्स संघाचा विचार करता त्यांच्यात सर्वाधिक जबाबदारी कर्णधार केएल राहुलवर असणार आहे. आयपीएलमध्ये मागील काही काळ पंजाबकडून एकहाती फलंदाजी सांभाळलेल्या राहुलला यंदा लखनौचं कर्णधारपद सांभाळत फलंदाजीत योगदान द्यायचे आहे. मागील सीजनमध्ये त्याने 13 सामन्यात 626 रन केले होते.


5. लखनौचा दुसरा सलामीवीर म्हणजे क्विंटन डि कॉक. मुंबई इंडियन्समधून यंदा लखनौमध्ये गेलेल्या डि कॉकवर यंदा अनेकांची नजर असेल. त्याला कोट्यवधी देऊन लखनौने खरेदी केले आहे. त्यामुळे यष्टीरक्षण आणि फलंदाजी अशा दोन्हामध्ये तो कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष असेल. मागील सीजनमध्ये त्याने 11 सामन्यात 297 रन केले होते.


गुजरात विरुद्ध लखनौ यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सामना रंगणार आहे. 


हे देखील वाचा-