IPL 2022 : कोलकाता आणि मुंबई यांच्यामध्ये आयपीएलच्या 15 व्या हंगामातील 14 वा सामना पार पडला. या सामन्यात कोलकाताने मुंबईचा पाच विकेटनं पराभव केला. या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि नितीश राणा यांना एक चूक चांगलीच महागात पडली. या दोन्ही खेळाडूंना आयपीएलने फटकारलेय. नितीश राणाला दंडही आकारण्यात आला आहे. आयपीएलने एका पत्रकाद्वारे याची माहिती दिली आहे.
नितीश राणा याने पुण्यात मुंबईविरोधात झालेल्या सामन्यादरम्यान आयपीएल आचारसंहिताचं उल्लंघन केले आहे. त्यामुळे नितीश राणा याला फटकारण्यात आले आहे. त्याशिवाय सामन्याच्या दहा टक्के रक्कमेचा दंडही ठोठावण्यात आला आहे, असे आयपीएलने आपल्या पत्रकात म्हटले आहे. आयपीएलच्या अधिकृत संकेतस्थळावर याची माहिती देण्यात आली आहे.
नितीश राणा याने आयपीएलच्या आचारसंहिता स्तर 1 चं उल्लंघन केल्याचे मान्य केले आहे. यासोबतच जसप्रीत बुमराहनेही आपली चूक मान्य केली आहे. बुमराहालाही फटकारण्यात आले आहे. आयपीएलने दोघांनाही कठोर शब्दात सुनावले आहे, रेफरीचा निर्णय प्रत्येकासाठी अंतिम असल्याचे सांगितले.
कमिन्सचं वादळ, वेंकटेशचा संयम, कोलकात्याचा मुंबईवर विजय -
मुंबईने दिलेल्या 162 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता संघाची सुरुवात निराशाजनक झाली. कोलकाताने नियमित अंतराने आपल्या विकेट फेकल्या. सलामी फंलदाज अजिंक्य रहाणे 7, कर्णधार श्रेयस अय्यर 10, सॅम बिलिंग्स 17, नितेश राणा 8 आणि आंद्रे रसेल 11 धांवावर बाद झाले. एका बाजूने वेंकटेश अय्यर किल्ला लढवत होता, मात्र दुसऱ्या बाजूला फलंदाज हराकिरी करत होते. त्यामुळे कोलकाता संघ पराभवाच्या छायेत पोहचला होता. मात्र, पॅट कमिन्स याने वादळी खेळी करत मुंबईला विजयापासून दूर ठेवले. पॅट कमिन्सने अवघ्या 15 चेंडूत 56 धावांची वादळी खेळी केली. या खेळीदरम्यान कमिन्सने सहा षटकार आणि चार चौकार लगावले. कमिन्सने मोक्याच्या क्षणी 14 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. कमिन्स आणि वेंकटेश अय्यर यांनी 18 चेंडूत 61 धावांची भागिदारी केली. या जोरावर कोलकाताने अशक्यप्राय विजय मिळवला आहे.