IPL 2022, RR vs GT : कर्णधार हार्दिक पांड्याच्या वादळी अर्धशतकानंतर लॉकी फर्गुसन आणि यश दयाल यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर गुजरातने राजस्थानचा 37 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह गुजरात संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान काबिज केले आहे. पाच सामन्यात गुजरातचा हा चौथा विजय आहे. 193 धावांच्या आव्हानाचा बचाव करताना गुजरातच्या गोलंदाजांनी राजस्थान संघाला निर्धारित 20 षटकात 9 गड्यांच्या मोबदल्यात 155 धावांपर्यंत रोखलं. गुजरातकडून पदार्पणवीर यश दयाल याने तीन विकेट घेतल्या. लॉकी फर्गुसन याने भेदक मारा करत राजस्थानच्या तीन गड्यांना तंबूत झाडले. मोहम्मद शमी आणि हार्दिक पांड्या यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.
राजस्थानच्या फलंदाजांचा फ्लॉप शो -
गुजरातने दिलेल्या 193 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात खराब झाली. दुसऱ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर देवदत्त पडिकल बाद झाला. पडिकलला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. पडिकल फक्त शून्य धावसंख्येवर बाद झाला. पडिकलनंतर अश्विन (8), कर्णधार संजू सॅमसन (11), सॅसी वॅन डुसेन (6) हे स्वस्तात माघारी परतले. एका बाजूला विकेट पडत असताना दुसरीकडे जोस बटलर याने गुजरातच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. बटलरने 24 चेंडूत 54 धावांची विस्फोटक खेळी केली. बटलरने 24 चेंडूत 54 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान बटलरने तीन षटकार आणि 8 चौकार लगावले. बटलरचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. रियान पराग (18) आणि शिमरॉन हेटमायर (29) यांचेही प्रयत्न अपुरे पडले.
गुजरातची 192 धावांपर्यंत मजल -
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फंलदाजीसाठी उतरलेल्या गुजरात संघाची सुरुवात निराशाजनक झाली. मॅथ्यू वेड 12 धावांवर माघारी परतला. त्यानंतर विजय शंकरही स्वसात बाद झाला. त्यामुळे गुजरातचा संघ अडचणीत सापडला होता. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि शुभमन गिल यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण गिलही 13 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर हार्दिक पांड्याने सामन्याची सर्व सुत्रे आपल्याकडे घेत हल्लाबोल केला. हार्दिक पांड्याने अभिनव मनोहरसोबत महत्वाची भागिदारी केली. हार्दिक पांड्याच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर गुजरातने निर्धारित 20 षटकात चार गड्यांच्या मोबदल्यात 192 धावांपर्यंत मजल मारली. राजस्थानकडून यजुवेंद्र चहल, रियान पराग आणि कुलदीप सेन यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
हार्दिक - अभिनवची महत्वाची भागिदारी -
हार्दिक पांड्या आणि अभिनव मनोहर यांनी मोक्याच्या क्षणी संघाचा डाव सावरला. हार्दिक पांड्या आणि अभिनव मनोहर यांनी 55 चेंडूत 86 धावांची भागिदारी केली. या भागिदारीच्या बळावर गुजरातच्या संघाने मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल केली. अभिनव मनोहर याने 28 चेंडूत 43 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने दोन षटकार आणि चार चौकार लगावेल. हार्दिक पांड्या आणि अभिनव मनोहर यांनी गुजरातच्या धावसंख्येचा पाया रचला.
मिलर किलरचा फिनिशिंग टच -
अभिनव मनोहर बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या डेविड मिलर यांने वादळी फलंदाजी केली. मिलरने 14 चेंडूत 31 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान मिलरने एक षटकार आणि पाच चौकार लगावले. मिलर आणि हार्दिक पांड्या यांनी 25 चेंडूत 53 धावांची भागिदारी केली.
हार्दिकची कर्णधाराला साजेशी खेळी
गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या याने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. हार्दिकने संघाचा डाव सावरला तोव्हा संयमी फलंदाजी केली. त्यानंतर हार्दिक पांड्या याने राजस्थानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. हार्दिक पांड्याने आधी अभिनव मनोहरसोबत 86 धावांची भागिदारी केली. त्यानंतर अखेरच्या षटकात डेविड मिलरसोबत 53 धावांची भागिदारी करता संघाची धावसंख्या वाढवली. हार्दिक पांड्याने 52 चेंडूचा सामना करताना 87 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान पांड्याने चार षटकार आणि 8 चौकार लगावले.