RR vs GT, IPL 2022:   हार्दिक पांड्या याने कर्णधाराला साजेशी फलंदाजी करत गुजरातच्या संघाचा डाव सावरला. हार्दिक पांड्याने मोक्याच्या क्षणी वादळी खेळी केली. हार्दिक पांड्याच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर गुजरातने निर्धारित 20 षटकात चार गड्यांच्या मोबदल्यात 192 धावांपर्यंत मजल मारली. हार्दिकला आधी अभिनव मनोहर याने साथ दिली, त्यानंतर डेविड मिलर याने झटपट वादळी खेळी करत संघाची धावसंख्या वाढवली. राजस्थान संघाला विजयासाठी 193 धावांचे आव्हान देण्यात आले आहे. राजस्थानकडून यजुवेंद्र चहल, रियान पराग आणि कुलदीप सेन यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. 


नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फंलदाजीसाठी उतरलेल्या गुजरात संघाची सुरुवात निराशाजनक झाली. मॅथ्यू वेड 12 धावांवर माघारी परतला. त्यानंतर विजय शंकरही स्वसात बाद झाला. त्यामुळे गुजरातचा संघ अडचणीत सापडला होता. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि शुभमन गिल यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण गिलही 13 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर हार्दिक पांड्याने सामन्याची सर्व सुत्रे आपल्याकडे घेत हल्लाबोल केला. हार्दिक पांड्याने अभिनव मनोहरसोबत महत्वाची भागिदारी केली. 


हार्दिक - अभिनवची महत्वाची भागिदारी - 
हार्दिक पांड्या आणि अभिनव मनोहर यांनी मोक्याच्या क्षणी संघाचा डाव सावरला.  हार्दिक पांड्या आणि अभिनव मनोहर यांनी 55 चेंडूत 86 धावांची भागिदारी केली. या भागिदारीच्या बळावर गुजरातच्या संघाने मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल केली. अभिनव मनोहर याने 28 चेंडूत 43 धावांची खेळी केली.  या खेळीदरम्यान त्याने  दोन षटकार आणि चार चौकार लगावेल.  हार्दिक पांड्या आणि अभिनव मनोहर यांनी गुजरातच्या धावसंख्येचा पाया रचला. 


मिलर किलरचा फिनिशिंग टच - 
अभिनव मनोहर बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या डेविड मिलर यांने वादळी फलंदाजी केली. मिलरने 14 चेंडूत 31 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान मिलरने एक षटकार आणि पाच चौकार लगावले. मिलर आणि हार्दिक पांड्या यांनी 25 चेंडूत 53 धावांची भागिदारी केली.   


हार्दिकची कर्णधाराला साजेशी खेळी
गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या याने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. हार्दिकने संघाचा डाव सावरला तोव्हा संयमी फलंदाजी केली. त्यानंतर हार्दिक पांड्या याने राजस्थानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. हार्दिक पांड्याने आधी अभिनव मनोहरसोबत 86 धावांची भागिदारी केली. त्यानंतर अखेरच्या षटकात डेविड मिलरसोबत 53 धावांची भागिदारी करता संघाची धावसंख्या वाढवली. हार्दिक पांड्याने 52 चेंडूचा सामना करताना 87 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान पांड्याने चार षटकार आणि 8 चौकार लगावले.