IPL 2022 Final: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील अंतिम सामन्यात राजस्थानचा संघ गुजरातशी (GT vs RR) भिडणार आहे. पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरातच्या संघानं राजस्थानला पराभूत करून अंतिम फेरीत धडक दिली होती. त्यानंतर क्वालिफायर 2 मध्ये राजस्थानच्या संघानं बंगळरूचा पराभव करून अंतिम फेरीत एन्ट्री केली. बंगळुरूविरुद्ध सामन्यात राजस्थानचा तडाखेबाज फलंदाज जोस बटलरनं 60 चेंडूत 106 धावांची खेळी केली. आजच्या सामन्यात जोस बटलर (Jos Buttler), राशिद खान (Rashid Khan), युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal), डेव्हिड मिलर (David Miller) आणि हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) कामगिरीवर सर्वांची नजर राहणार आहे. 


जोस बटलर
राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलर यंदाच्या हंगामात उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. या हंगामातील 16 सामन्यात त्यानं 824 धावा केल्या आहेत. यादरम्यान, जोस बटलरचा स्ट्राइक रेट 151.47 इतका आहे. तर सरासरी 58.86 इतकी आहे. त्याचबरोबर या हंगामात बटलरनं चार शतके झळकावली आहेत. सध्या जोस बटलरकडे ऑरेंज कॅप आहे.


राशिद खान
गुजरात टायटन्सचा अष्टपैलू खेळाडू राशिद खाननं यंदाच्या हंगामात गोलंदाजीसह फलंदाजीनंही चांगलं प्रदर्शन करून दाखवलं आहे. त्यानं आतापर्यंत 15 सामन्यात 18 विकेट्स घेतले आहेत. या हंगामात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत राशिद खान नवव्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर राशिद खानची यंदाच्या हंगामातील सरासरी 22.39 इतकी आहे.


युजवेंद्र चहल
राजस्थानचा फिरकीरटू युजवेंद्र चहलसाठी यंदाचा हंगाम चांगला ठरला आहे. पर्पल कॅपच्या शर्यतीत चहल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या वानिंदू हसरंगासोबत संयुक्तपणे अव्वल स्थानावर आहे. युझवेंद्र चहलनं या हंगामातआतापर्यंत 26 विकेट घेतल्या आहेत. तसेच त्यानं एका सामन्यात 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. या हंगामात चहलची सरासरी 16.54 इतकी आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात चहल विरोधी संघासाठी डोके दुखी ठरण्याची शक्यता आहे. 


डेव्हिड मिलर
गुजरात टायटन्सचा आक्रमक फलंदाज डेव्हिड मिलरनं आपल्या संघासाठी फिनिशरची भूमिका बजावली आहे. क्वालिफायर-1 मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध डेव्हिड मिलरनं प्रसिद्ध कृष्णाच्या शेवटच्या षटकात सलग तीन षटकार ठोकून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. डेव्हिड मिलरनं हंगामात आतापर्यंत 15 सामन्यात 449 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 64.14 इतका होता.


हार्दिक पांड्या
गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघानं चांगली कामगिरी करून दाखवली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सनं 20 गुणांसह लीग टप्प्यात अव्वल स्थान पटकावलं. हार्दिक पांड्यानं या हंगामातील 14 सामन्यात 453 धावा केल्या होत्या. राजस्थानविरुद्ध सामन्यात हार्दिक पांड्या फलंदाजी आणि गोलंदाजीनंही चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे.


हे देखील वाचा-