पंजाब किंग्जला शेवटच्या षटकात विजयासाठी 4 धावांची गरज होती. पण कार्तिक त्यागीने शानदार गोलंदाजी करताना निकोलस पूरन आणि नंतर दीपक हुड्डाची विकेट घेतली आणि सामना पंजाबच्या हातातून हिसकावून घेतला. त्याने शेवटच्या षटकात फक्त एक धाव दिली. अशा प्रकारे राजस्थानने हा सामना 2 धावांनी जिंकला. पंजाब किंग्ज संघाला 186 धावांचे लक्ष्य मिळाले होते, पण संघ निर्धारित 20 षटकांत चार गडी गमावून केवळ 183 धावा करू शकला.


 


तत्पूर्वी, यशस्वी जयस्वालच्या (Yashasvi Jaiswal) 49 आणि महिपाल लोमरच्या (Mahipal Lomror) 43 धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या आयपीएल 2021 च्या 32 व्या सामन्यात पंजाब किंग्जला 186 धावांचे लक्ष्य दिलं होतं. वास्तविक, राजस्थानचा संघ निर्धारित 20 षटकांत 185 धावांवर आटोपला. पंजाब किंग्जसाठी युवा गोलंदाज अर्शदीप सिंगने चार षटकांत 32 धावा देऊन पाच बळी घेतले. या कामगिरीने त्याने सर्व क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली आहेत.


 


पंजाब किंग्जचा कर्णधार लोकेश राहुलने (KL Rahul) या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने (RR) चांगली सुरुवात केली. राजस्थानच्या दोन्ही सलामीवीरांनी संघाला शानदार सुरुवात दिली. त्यानंतर महिपाल लोमरने आक्रमक पद्धतीने फलंदाजी केली.


 


अशी होती राजस्थानची खेळी
यशवी जैस्वाल आणि एविन लुईस यांच्यात पहिल्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी झाली. यानंतर, अर्शदीप सिंगने लुईसला सहाव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मयंक अग्रवालकरवी झेल बाद करत पंजाब संघाला पहिलं यश मिळवून दिलं. एविन लुईसने 21 चेंडूत 36 धावांची खेळी केली. त्याच्या डावादरम्यान त्याने स्फोटक शैलीत 7 चौकार आणि 1 षटकार ठोकला. लुईस बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आलेला राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन काही विशेष करू शकला नाही. तो 5 चेंडूत 4 धावा करून इशान पोरेलचा बळी ठरला. संजू सॅमसनचा झेल केएल राहुलच्या हाती लागला. यानंतर यशस्वी जैस्वाल आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांच्यात चांगली भागीदारी झाली, जी अर्शदीप सिंगने मोडली. लियामने 17 चेंडूत 25 धावा केल्या. त्याच्या डावादरम्यान त्याने 2 चौकार आणि 1 षटकार ठोकला.


 



यशस्वी जैस्वालने फिफ्टी हुकली
हरप्रीत ब्रारने 136 धावांवर राजस्थान संघाला चौथा धक्का दिला. शानदार फलंदाजी करणारा यशस्वी जयस्वाल 36 चेंडूत 49 धावा करून बाद झाला. त्याचं अर्धशतक एक धावेनं हुकलं. या खेळीदरम्यान त्याने 6 चौकार आणि 2 शानदार षटकार ठोकले. मोहम्मद शमीने राजस्थानला 166 धावांवर पाचवा धक्का दिला. रियान पराग 5 चेंडूत 4 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.









महिपाल लोमरोची शानदार खेळी
महिपाल लोमरोरने पंजाब किंग्जविरुद्ध आक्रमक फलंदाजी केली. त्याने 17 चेंडूत 43 धावांची शानदार खेळी खेळली. या खेळीदरम्यान त्याने 2 चौकार आणि 4 जबरदस्त षटकार ठोकले. अर्शदीप सिंगने महिपालला बाद केले. जेव्हा तो बाद झाला, तेव्हा संघाची धावसंख्या 169 धावा होती. यानंतर शमीने प्रथम राहुल तेवतिया आणि नंतर ख्रिस मॉरिसला 19 व्या षटकात पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले.


 


राहुल तेवतिया तेवतिया 5 चेंडूत 2 धावांवर बोल्ड झाला. त्यानंतर शमीने 19 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर एडेन मार्कराम करवी ख्रिस मॉरिसला झेलबाद केलं. शेवटच्या षटकात अर्शदीप सिंगने चेतन साकरियाला 7 धावांवर बाद केले आणि नंतर पुढच्या चेंडूवर कार्तिक त्यागीला बोल्ड करून आपल्या पाच विकेट्स पूर्ण केल्या. पंजाब किंग्जकडून अर्शदीप सिंगने पाच आणि मोहम्मद शमीने तीन बळी घेतले. तर हरप्रीत बरार आणि इशान पोरेल यांनी 1-1 गडी बाद केला.