Bangalore vs Punjab: शारजाह येथे खेळल्या जात असलेल्या आयपीएल 2021 च्या 48 व्या सामन्यात, विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने पहिल्यांदा फलंदाजी करत पंजाब किंग्जसमोर 165 धावांचे लक्ष्य ठेवले. कर्णधार विराट कोहली आणि देवदत्त पडिकलने आरसीबीला संघाची शानदार सुरुवात करून दिली. असे वाटत होते की बेंगळुरूचा संघ आज मोठी धावसंख्या उभारेल. पण, मोईसेस हेनरिक्सने मधल्या षटकांत शानदार गोलंदाजी करत आरसीबीला रोखण्यात यश मिळवलं. हेनरिक्सने आपल्या चार षटकांत केवळ 12 धावा देऊन तीन बळी घेतले. त्याचवेळी ग्लेन मॅक्सवेलने RCB कडून सर्वाधिक 53 धावा केल्या. त्याने 33 चेंडूंच्या खेळीत तीन चौकार आणि चार षटकार मारले.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकल्यानंतर विराट कोहली आणि देवदत्त पडिकल यांनी आरसीबीला चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली. आरसीबीची पहिली विकेट कोहलीच्या रूपात पडली. त्याने 24 चेंडूत एक षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने 25 धावा केल्या. यानंतर आरसीबीचा डाव अचानक ढासळला आणि त्यांनी दुसरी विकेट 68 वर आणि नंतर तिसरी विकेट 73 धावांवर गमावली. पहिल्यांदा डॅनियल ख्रिश्चन 00 आणि नंतर देवदत्त पॅडकिल 40 धावांवर बाद झाला.
पहिल्या सहा षटकांत कोणत्याही विकेटशिवाय 54 धावा करणाऱ्या आरसीबीने 12 व्या षटकात केवळ 73 धावांवर तीन महत्त्वाच्या विकेट गमावल्या होत्या. यानंतर ग्लेन मॅक्सवेलने पंजाबच्या गोलंदाजांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. त्याने फक्त 33 चेंडूत 57 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या फलंदाजीतून तीन चौकार आणि चार षटकार आले. दुसऱ्या हाफमध्ये मॅक्सवेलचे हे तिसरे अर्धशतक आहे. त्याचबरोबर एबी डिव्हिलियर्सने 18 चेंडूत 23 धावा केल्या. एबीच्या बॅटमधून एक चौकार आणि दोन षटकार आले. शेवटच्या दोन षटकांत आरसीबीला पुन्हा गळती लागली. या दरम्यान मॅक्सवेल 57, एबी 23, शाहबाज अहमद 08 आणि जॉर्ज गार्टन 00 धावांवर बाद झाला. त्याचवेळी हर्षल पटेल 01 आणि केएस भरत 00 वर नाबाद परतला.
पंजाब किंग्जसाठी मोईसेस हेनरिक्सने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने आपल्या चार षटकांत फक्त 12 धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद शमीने 39 धावांत तीन बळी घेतले. त्याचबरोबर हरप्रीत बराराने अत्यंत किफायतशीर गोलंदाजी केली. त्याने चार षटकांत फक्त 26 धावा दिल्या.