PBKS vs CSK : आयपीएल 2021 चा आठवा सामना पंजाब आणि चेन्नई यांच्यात आज संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी खेळवण्यात येणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवला जाईल. पंजाबने या सीझनच्या पहिल्या सामन्यात जिंकत आपली सुरुवात केली आहे. तर चेन्नईला या सीझनच्या पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. 


चेन्नई आजचा सामना जिंकत या सीझनमधील पहिला विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तर पंजाबचा नजर आपली विजयी घौडदौड सुरु ठेवण्यावर असणार आहे. चेन्नईसमोरील सर्वात मोठं आव्हान म्हणजे, त्यांच्या संघात अनेक वयस्कर खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे चेन्नईच्या फलंदाजांना सुरुवातीला धमाकेदार खेळी करणं अत्यंत आवश्यक असणार आहे. गेल्या सामन्यात सॅम करनने शेवटी 15 चेडूंमध्ये 34 धावा केल्या होत्या आणि संघाच्या बाजूने विरोधी संघासमोर आव्हान ठेवण्यास मदत केली होती. 


पंजाबच्या संघाकडून दीपक हुड्डाने गेल्या सामन्यात 28 चेंडूंमध्ये 64 धावा केल्या होत्या. चेन्नई विरुद्ध हुड्डाव्यतिरिक्त केएल राहुल, क्रिस गेल, निकोलस पूरन आणि शाहरुख खान या फलंदाजांना आपली धमाकेदार खेळी करावी लागेल. तसेच चेन्नईच्या टॉप ऑर्डर फलंदाजांनी धावा करणं अत्यंत गरजेचं आहे. याव्यतिरिक्त धोनी ब्रिगेडला गोलंदाजीवरही विशेष लक्ष द्यावं लागणार आहे. 


दरम्यान, दोन्ही संघांबाबत बोलायचे झाले तर पंजाबचा संघ चेन्नईच्या तुलनेत मजबूत दिसून येत आहे. चेन्नईच्या संघात युवा खेळाडूंचा समावेश तसा फारसा नाही. तसेच फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये पंजाबचा संघ चेन्नईपेक्षा एक पाऊल पुढेच दिसून येत आहे. असं असलं तरी चेन्नईच्या संघात अनेक अनुभवी खेळाडू आहेत. त्यामुळे आजचा सामना अतीटतीचा होण्याचीही शक्यता आहे. तसेच धोनीच्या नेतृत्त्वात खेळणारा चेन्नईचा संघ आज मैदानात काय कमाल दाखवणार हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहेत. 


पंजाबचा संभाव्य संघ :  केएल राहुल (कर्णधार आणि विकेटकीपर), मयंक अग्रवाल, क्रिस गेल, दीपक हुड्डा, निकोलस पूरन, शाहरुख खान, झाय रिचर्डसन, मुरुगन अश्विन, रिले मेरेडिथ, अर्शदीप सिंह आणि मोहम्मद शमी. 


चेन्नईचा संभाव्य संघ : ऋतुराज गायकवाड, फाफ डू प्लेसिस, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), सॅम करन, ड्वेन ब्रावो, रविंद्र जाडेजा, शार्दुल ठाकुर आणि दीपक चहर.