मुंबई : मुंबई इंडियन्सने श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या लसिथ मलिंगाला आगामी मोसमच्या अगोदरच रिलीज केलं आहे. आयपीएलमध्ये 122 सामने खेळणार्या लसिथ मलिंगाने 170 विकेट घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये 13 धावा देऊन 5 विकेट ही मलिंगाची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.
मुंबई इंडियन्स फ्रॅन्चायजीने म्हटलं की, मुंबई इंडियन्सने श्रीलंकेचा महान खेळाडू लसिथ मलिंगा, न्यूझीलंडचे मिचेल मॅक्लेनाघन, ऑस्ट्रेलियाचे नाथन कुल्टर नाईल आणि जेम्स पॅटिन्सन, गुयानाचा शेरेफेन रदरफोर्ड, अनकॅप्ड लेगस्पिनर प्रिन्स बलवंत राय आणि वेगवान गोलंदाज दिग्विजय देशमख या खेळाडूंना रिलीज केलं आहे.
आयपीएलच्या 2020 च्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सनचा समावेश मलिंगाच्या जागी केला. लसिथ मलिंगाने वैयक्तिक कारणास्तव खेळण्यास नकार दिला होता. मुंबई इंडियन्सने आपला मूळ संघ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असून त्यात कर्णधार रोहित शर्मा, यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डिकॉक, स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या आणि क्रुणाल पांड्या यांचा समावेश आहे.
आयपीएलचं सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद पटकावलेल्या मुंबई इंडियन्सकडे संघात 18 खेळाडू असून ‘मिनी लिलावात’सात खेळाडूंचा समावेश केला जाऊ शकतो. तसेच पुढच्या हंगामासाठी मुंबई इंडियन्स संघात चार परदेशी खेळाडूंची निवड करू शकतो.