MI vs RR, Match Highlights : अतिशय महत्वाच्या सामन्यात टिच्चून गोलंदाजी केल्यानंतर इशान किशनच्या (नाबाद 50) सुरेख फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएल 2021 च्या 51 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा 8 गडी राखून पराभव केला. 13 सामन्यांत मुंबईचा हा सहावा विजय आहे. राजस्थानने दिलेल्या माफक 91 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने 8.2 षटकांत 2 गडी गमावून हे लक्ष्य गाठलं. मुंबईसाठी इशान किशनने 25 चेंडूत 50 धावांची खेळी खेळली. राजस्थानकडून चेतन साकारिया आणि मुस्तफिजूर रहमानने प्रत्येकी एक बळी घेतला. या विजयासह मुंबईच्या प्लेऑफच्या आशा कायम आहेत. मात्र, तरीही कोलकात्याच्या कामगिरीच्या आधारे मुंबईचे भवितव्य ठरवले जाईल.


रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स 12 गुणांसह गुणतालिकेत 7 व्या स्थानावरून 5 व्या स्थानावर पोहोचला आहे. या विजयामुळे मुंबईने प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. त्यांच्या नेट रन रेटमध्येही सुधारणा झाली आहे. दरम्यान, राजस्थान संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.


या विजयानंतर मुंबईचे 13 सामन्यांत 12 गुण झालेत आणि कोलकाता नाईट रायडर्सचेही समान गुण आहेत. मात्र, चांगल्या धावसंख्येच्या आधारे ते गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहेत. मुंबईला पुढील सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि केकेआरला बंगलोरशी खेळायचे आहे. दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांनी प्लेऑफमध्ये आधीच स्थान मिळवलं आहे.


राजस्थानने दिलेल्या 91 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई संघाला पहिल्या डावातील चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर पहिला धक्का बसला. युवा वेगवान गोलंदाज चेतन साकरिया याने कर्णधार रोहित शर्माला 22 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर तंबूत पाठवलं.


यानंतर सूर्यकुमारनेही इशानची साथ सोडली. तोही लवकर बाद झाला. सूर्यकुमार यादव मुस्तफिजूरच्या चेंडूवर झेलबाद झाला. ईशानने 25 चेंडूंत 5 चौकार आणि 3 षटकारांसह अर्धशतक केले. हार्दिक पंड्या 6 चेंडूत नाबाद 5 धावांवर परतला.


कुल्टर-नाईलचे 4 तर नीशमच 3 बळी
तत्पूर्वी, नॅथन कुल्टर-नाईल (4/14), जसप्रीत बुमराह (14/2) आणि जेम्स नीशम (3/12) यांच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर, मुंबई इंडियन्सने शारजाह येथे खेळलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा डाव 90 धावांत गुंडाळला. 


मुंबईनं नाणेफेक जिंकत राजस्थानला दिली फलंदाजीची संधी
मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा निर्णय योग्य ठरला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान 20 शतकांत 9 गडी गमावत केवळ 90 धावा करु शकले.


राजस्थानचे फलंदाज अपयशी
राजस्थानची सुरुवात संथ झाली. सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि एविन लुईस यांनी पहिल्या विकेटसाठी 22 धावांची भागीदारी केली. ही वाढती भागीदारी कूल्टर-नाईलने जैस्वाल (12) ला बाद करून तोडली. यानंतर लुईसही फार काळ टिकू शकला नाही. त्याला बुमराहने एलबीडब्ल्यू करुन पॅव्हेलियनमध्ये पाठवले.


लुईसने 19 चेंडूत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 24 धावा केल्या. यानंतर राजस्थानच्या ठराविक अंतराने विकेट पडू लागल्या. प्रथम कर्णधार संजू सॅमसन (3) नंतर शिवम दुबे (3) आणि ग्लेन फिलिप्स (4) धावांवर बाद झाला.


राहुल तेवतिया आणि डेव्हिड मिलर यांनी सहाव्या विकेटसाठी 21 धावांची भागीदारी केल्याने डाव पुढे नेला. पण या हंगामात मुंबईसाठी आपला पहिला सामना खेळणाऱ्या नीशमने तेवतिया  (12) बाद करत तंबूचा रस्ता दाखवला. यानंतर फलंदाजीसाठी आलेला श्रेयस गोपाल खाते न उघडता बाद झाला. गोपालला बुमराहने बोल्ड केले. मिलर (15) आणि चेतन सकारिया (6) दोघांनाही कुल्टर नाईलने आपली शिकार केले. मुस्तफिजुर रहमान 6 धावांवर नाबाद राहिला.