IPL 2021, KKR vs DC : कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) मंगळवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2021) दिल्ली कॅपिटल्सचा (DC) तीन गडी राखून पराभव केला. गोलंदाजांच्या उत्तम कामगिरीनंतर नितीश राणाच्या संघर्षपूर्ण खेळीमुळे बाद फेरीत स्थान मिळवण्याच्या त्यांच्या आशा जिवंत ठेवल्या. या पराभवानंतर सलग चार विजयांची दिल्लीची विजयी मालिकाही खंडित झाली आहे.
दिल्लीच्या 128 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नाईट रायडर्स नितीश राणा (27 चेंडूंत नाबाद 36), शुभमन गिल (30) आणि सुनील नरेन (10 चेंडूत 21 धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर नाईट रायडर्सने 18.2 षटकांत सात गड्यांच्या बदल्यात 130 धावा करत विजय मिळवला. दिल्लीसाठी वेगवान गोलंदाज आवेश खानने 13 धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या. पण आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
दिल्लीच्या फलंदाजांचा डावात एकही षटकार नाही
तत्पूर्वी, दिल्लीसाठी कर्णधार पंतने 36 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 39 धावांची खेळी खेळली. त्याच्याशिवाय स्टीव्ह स्मिथनेही 34 चेंडूत 39 धावा केल्या. विशेष म्हणजे आजच्या सामन्यात दिल्लीच्या एकाही फलंदाजाने षटकार मारला नाही. डावाच्या शेवटच्या षटकात दिल्लीची निराशाजनक कामगिरी झाली. टीम साऊदीने या षटकात रविचंद्रन अश्विनला प्रथम पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यांच्यानंतर कर्णधार ऋषभ पंत आणि आवेश खान धावबाद झाला. शेवटच्या षटकात दिल्लीच्या 3 विकेट पडल्या. निर्धारित 20 षटकांत दिल्लीने 9 गड्यांच्या बदल्यात 127 धावा केल्या. कर्णधार ऋषभ पंत आणि स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 39-39 धावांचे योगदान दिले. शिखर धवनने 24 धावा केल्या. या तिघांशिवाय दिल्लीचा एकही फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकला नाही.
SRH vs RR, Match Highlights: हैदराबादची राजस्थानवर सात विकेटने मात; जेसन रॉय, विल्यमसन्सचे अर्धशतक
कोलकात्याकडून व्यंकटेश अय्यर, सुनील नारायण आणि लॉकी फर्ग्युसनने 2-2 विकेट्स घेतल्या. तर टीम साऊदीला एक यश मिळालं. नाणेफेक जिंकल्यानंतर कोलकाता संघाने दिल्लीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले, ज्याचा केकेआरच्या गोलंदाजांनी पुरेपूर फायदा घेतला. दिल्ली संघाची नवीन सलामीची जोडी शिखर धवन आणि स्टीव्ह स्मिथ यांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 35 धावा जोडल्या, पण पाचव्या षटकात धवन (24) ला लॉकी फर्ग्युसनने झेलबाद करून दिल्लीला पहिला धक्का दिला.
धवन बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरला केवळ एक धाव केल्यावर दिग्गज फिरकीपटू सुनील नारायणने त्याला बोल्ड केले. 40 धावांवर दोन विकेट गमावल्यानंतर स्मिथ आणि कर्णधार ऋषभ पंतने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला पण कोलकात्याने त्यांना परत येण्याची संधी दिली नाही. 13 व्या षटकात स्मिथला (39) फर्ग्युसननेही बोल्ड केले. शिमरॉन हेटमायर (4) पुढच्याच षटकात अष्टपैलू व्यंकटेश अय्यरचा बळी ठरला.
नाइट रायडर्स गुणतालिकेत चौथ्या स्थानी
या विजयासह नाइट रायडर्सचे 11 सामन्यांमधील पाच विजयांमधून 10 गुण झाले असून संघ चौथ्या स्थानावर आला आहे. तर दिल्लीचे 11 सामन्यांतील आठ विजयांमधून 16 गुण असून ते दुसऱ्या स्थानावर आहेत. चेन्नई सुपर किंग्जचेही 16 गुण आहेत. परंतु, ते चांगल्या रन रेटमुळे अव्वल स्थानावर आहेत, तर त्यांनी दिल्लीपेक्षा एक सामना कमी खेळला आहे.