IPL 2021 : आयपीएलचा 14वा सीझन कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनिश्चित काळासाठी आयपीएल स्थगित करण्यात आली आहे. तसेच सप्टेंबरमध्ये आयपीएलचं आयोजन पुन्हा केलं जाईल, असं सांगितलं जात आहे. आयपीएल रद्द झाल्यामुळे नाराज झालेले चाहत्यांना आयपीएलचं आयोजन पुन्हा कधी, केव्हा आणि कुठे करण्यात येणार याबाबत उत्सुकताही आहे. अशातच आयपीएलच्या आयोजनाबाबत मोठी बातमी हाती आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएलच्या उरलेल्या सामन्यांचं आयोजन इंग्लंडमध्ये केलं जाऊ शकतं. आयपीएलच्या उरलेल्या 31 सामन्यांचं आयोजन करण्यासाठी इंग्लिश काउंटीच्या वतीनं बीसीसीआयला प्रस्ताव देण्यात आला आहे.
आयपीएलमधील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर IPL रद्द
दरम्यान, आयपीएलच्या 14व्या सीझनमध्ये आतापर्यंत 29 सामने पार पडले होते. त्यानंतर काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे आयपीएल रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता आयपीएलचं आयोजन होणार का? झालं तर कुठे होणार आणि कधी होणार? यांसारखे अनेक प्रश्न सध्या चाहत्यांच्या मनात आहेत. 4 मेरोजी मंगळवारी आयपीएल गवर्निंग काउंसिलची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत बीसीसीआयनं आयपीएल रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. बायो बबलमध्ये असूनही कोरोनाची लागण झाल्यानं बीसीसीआयच्या वतीनं आयपीएलचे उर्वरित सामने अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
इंग्लिश काउंटीचा आयपीएलच्या आयोजनासाठी प्रस्ताव
मीडिया रिपोर्टनुसार, इंग्लिश काउंटीच्या एका ग्रुपने यंदाच्या आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचं आयोजन सप्टेंबरमध्ये करण्याचा प्रस्ताव दिला आहे. ESPNcricinfo ने दिलेल्या माहितीनुसार, एमसीसी, सर्रे, वार्विकशायर आणि लंकशायरने ईसीबीला एक पत्र पाठवलं आहे. या लेटरमध्ये यंदाच्या वर्षी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात उर्वरित सामने इंग्लंडमध्ये खेळवण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे.
आयसीसी विश्वचषकापूर्वी आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचं आयोजन?
दरम्यान, इंडियन टीम यंदाच्या वर्षी इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये टीम इंडियाद्वारे इंग्लंडच्या विरोधात 5 कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. अशातच अंदाज वर्तवण्यात येत आहे की, इंग्लंड विरोधातील कसोटी मालिका पार पडली की, आयसीसी विश्वचषकापूर्वी टीम इंडियाकडे वेळ असणार आहे. त्यामुळे यादरम्यान आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचं आयोजन केलं जाऊ शकतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :