DC vs RCB Score : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सला 20 षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात 172 धावांचे लक्ष्य दिलं आहे. यात मिस्टर 360 अर्थात एबी डिव्हिलियर्सने 42 चेंडूत 3 चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने नाबाद 75 धावांची खेळी केली. डिव्हिलियर्सच्या तुफानी खेळीमुळे बंगळुरू मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहचू शकला. त्याच्याव्यतिरिक्त रजत पाटीदारने 31 आणि ग्लेन मॅक्सवेलने 25 धावा केल्या. तर इशांत शर्मा, कॅगिसो रबाडा, अवेश खान, अमित मिश्रा आणि अक्षर पटेल यांनी दिल्ली कॅपिटलसाठी या मोसमातील पहिला सामना खेळत प्रत्येकी एक गडी बाद केला.


टॉस जिंकल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने बंगळुरूला डावाची सुरुवात करण्यास आमंत्रण दिले. प्रथम फलंदाजीला आलेल्या बंगळुरूची सुरुवात खराब झाली. चौथ्या षटकात विराट कोहली (12) आवेश खानच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. त्यानंतर पुढच्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर इशांत शर्माने देवदत्त पडीक्कलला (17) माघारी धाडलं. 6 षटकात बंगळुरूची 2 बाद 36 धावा अशी अवस्था झाली होती. त्यानंतर मैदानात आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने रजत पाटीदारसोबत 30 धावांची पार्टनरशीप केली. आक्रमक खेळणाऱ्या मॅक्सवेलला अमित मिश्राने तंबूचा रस्ता दाखवला. 


मॅक्सवेलनंतर आलेल्या एबी डिव्हिलियर्सने नंतर रजत पाटीदारसोबत चांगली खेळी केली. पाटीदार 31 धावांवर बाद झाला. त्यानंतर डिव्हिलियर्सने एकहाती फटकेबाजी सुरुच ठेवली. डिव्हिलियर्सने 42 चेंडूत 5 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 75 धावांची खेळी केली. 20 षटकात बंगळुरूने 5 बाद 171 धावा जमवल्या.


प्लेईंग इलेव्हन
बंगळुरू : विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडीक्कल, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, वॉशिंग्टन सुंदर,  डॅनियल सॅम्स, काईल जेमीसन, हर्षल पटेल, यजुर्वेंद्र चहल, मोहम्मद सिराज.


दिल्ली: शिखर धवन, पृथ्वी शॉ, स्टीव्ह स्मिथ, ऋषभ पंत (कर्णधार) शिमरॉन हेटमायर, मार्कस स्टोनिस, इशांत शर्मा, अक्षर पटेल, कगिसो रबाडा, अमित मिश्रा, आवेश खान.