IPL Auction 2021: ऑस्ट्रेलियाचा  फलंदाज स्टीव्ह स्मिथला 2.20 कोटी रुपांची बोली लावून दिल्ली कॅपिटल्सने खरेदी केलं आहे. स्टीव्ह स्मिथ या आधी राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत होता. यावेळी सुरवातीपासूनच त्याच्याबद्दल बर्‍यापैकी चर्चा होती. स्मिथ कोणत्या संघांतून खेळेल याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती.


राजस्थान रॉयल्सने आपला कर्णधार स्टीव्ह स्मिथला आयपीएल 2021 च्या लिलावाआधी रिलिज केलं होतं. स्टीव्ह स्मिथनं आयपीएल 2020 च्या 14 सामन्यांमध्ये 311 धावा केल्या होत्या. त्यानंतरही स्टीव्ह स्मिथला आयपीएल 2021 च्या लिलावात सर्वाधिक रक्कर मिळू शकते असं बोललं जातं होतं. आयपीएलमध्ये स्टीव्ह स्मिथचं करिअर जबरदस्त राहिलं आहे. त्यानं आयपीएलमध्ये 95 सामन्यात 35.34 च्या सरासरीनं 2333 धावा केल्या आहेत.


दरम्यान ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलला 14.25 कोटी रुपांची बोली लावून रॉयल चॅलेंजर बंगलोरने खरेदी केलं आहे. मॅक्सवेलला खरेदी करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर बंगलोर यांच्यात चढाओढ सुरु होती. परंतु, अखेर सर्वाधिक 14.25 कोटींची बोली लावून बंगलोरने मॅक्सवेलला आपल्या टीममध्ये घेतलं आहे.


कोणत्या देशातील किती खेळाडूंचा यात सहभाग असेल?


आजच्या लिलावात विदेशी खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचे 35, न्यूझीलंडचे 20, वेस्ट इंडिजचे 19, इंग्लंडचे 17, दक्षिण आफ्रिकेचे 14, श्रीलंका 9, अफगाणिस्तानचे 7 जणांचा समावेश आहे. याखेरीज नेपाळ, युएई आणि यूएसएमधील प्रत्येकी एक खेळाडू आजच्या लिलावात भाग घेणार आहे.


वाचा : Glenn Maxwelln साठी CSK अन् RCB मध्ये चढाओढ; RCB ने मोजले तब्बल...


9 खेळाडूंची बेस किंमत 2 कोटी


गुरुवारी होणाऱ्या लिलावात केदार जाधव, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ यांच्यासह 9 खेळाडू आहेत, ज्यांची बेस प्राईज दोन कोटी रुपये आहे. आजच्या लिलावात दीड कोटी रुपयांची बेस प्राईज असलेले 12 खेळाडू सहभागी होतील. तर 11 खेळाडू असे आहेत ज्यांची बेस प्राईज एक कोटी रुपये आहे.


संघात किती खेळाडू असू शकतात?


सर्व फ्रँचायझींमध्ये त्यांच्या संघात जास्तीत जास्त 25 खेळाडू आणि किमान 18 खेळाडू घेऊ शकतात. त्याचबरोबर संघात परदेशी खेळाडूंची संख्या आठ असू शकते. महत्त्वाचे म्हणजे आयपीएलच्या आठही फ्रँचायजींनी लिलावापूर्वी 139 खेळाडूंना कायम ठेवले आहे. तर 57 खेळाडूंना त्यांच्या सध्याच्या संघाने रिलीज केलं आहे. सनरायझर्स हैदराबादने सर्वाधिक खेळाडू कायम ठेवले आहेत. त्याच वेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सर्वाधिक खेळाडूंना रिलीज केलं आहे.