IPL 2021 Auction | ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलला 14.25 कोटी रुपयांची बोली लावून रॉयल चॅलेंजर बंगलोरने खरेदी केलं आहे. मॅक्सवेलला खरेदी करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर बंगलोर यांच्यात चढाओढ सुरु होती. परंतु, अखेर सर्वाधिक 14.25 कोटींची बोली लावून बंगलोरने मॅक्सवेलला आपल्या टीममध्ये घेतलं आहे.


आयपीएलच्या लिलावाच्या एक दिवसाअगोदर ग्लेन मॅक्सवेलने आयपीएलच्या 14व्या सीझनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. दरम्यान, मॅक्सवेल गेल्या सीझनमध्ये किंग्स इलेव्हन पंजाब या संघातून खेळत होता. आयपीएल 2020 मध्ये तो फारशी चांगली कामगिरी करु शकला नाही. ज्यामुळे फ्रॅचायझीने त्याला रिलीज केलं होतं. पंजाबने मॅक्सवेलसहित एकूण 9 खेळाडूंना रिलीज केलं होतं.


लिलावासाठी सहभागी करण्यात आलेल्या 292 खेळाडूंमध्ये 42 वर्षांचा नयन दोषी सर्वाधिक वय असणारा खेळाडू आहे, तर नूर अहमद सर्वात युवा खेळाडू आहे. नयन आणि नूर अहमद यांची बेस प्राइज प्रत्येकी 20 लाख रुपये ठरवण्यात आली आहे. नयनने सौराष्ट्र, राजस्थान आणि सरे यांच्यासाठी 2001 ते 2013 यादरम्यान एकूण 70 प्रथम श्रेणीतील सामने खेळले आहेत. तसेच नूर काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगचा हिस्सा होते.


कोणत्या देशातील किती खेळाडूंचा यात सहभाग असेल?


आजच्या लिलावात विदेशी खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचे 35, न्यूझीलंडचे 20, वेस्ट इंडिजचे 19, इंग्लंडचे 17, दक्षिण आफ्रिकेचे 14, श्रीलंका 9, अफगाणिस्तानचे 7 जणांचा समावेश आहे. याखेरीज नेपाळ, युएई आणि यूएसएमधील प्रत्येकी एक खेळाडू आजच्या लिलावात भाग घेणार आहे.


9 खेळाडूंची बेस किंमत 2 कोटी


गुरुवारी होणाऱ्या लिलावात केदार जाधव, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ यांच्यासह 9 खेळाडू आहेत, ज्यांची बेस प्राईज दोन कोटी रुपये आहे. आजच्या लिलावात दीड कोटी रुपयांची बेस प्राईज असलेले 12 खेळाडू सहभागी होतील. तर 11 खेळाडू असे आहेत ज्यांची बेस प्राईज एक कोटी रुपये आहे.


संघात किती खेळाडू असू शकतात?


सर्व फ्रँचायझींमध्ये त्यांच्या संघात जास्तीत जास्त 25 खेळाडू आणि किमान 18 खेळाडू घेऊ शकतात. त्याचबरोबर संघात परदेशी खेळाडूंची संख्या आठ असू शकते. महत्त्वाचे म्हणजे आयपीएलच्या आठही फ्रँचायजींनी लिलावापूर्वी 139 खेळाडूंना कायम ठेवले आहे. तर 57 खेळाडूंना त्यांच्या सध्याच्या संघाने रिलीज केलं आहे. सनरायझर्स हैदराबादने सर्वाधिक खेळाडू कायम ठेवले आहेत. त्याच वेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सर्वाधिक खेळाडूंना रिलीज केलं आहे.