IPL 2020 : आज आयपीएलच्या 13 व्या सीझनमधील चौथा सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात रंगणार आहे. इंडियन प्रिमियर लीगच्या 13व्या सीझनला सुरुवात होण्याआधीपासूनच सीएसकेला अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. संघातील दोन खेळाडूंसह काही क्रू मेंबर्सना कोरोनाची लागण झाली होती. परंतु, आता सीएसकेच्या सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लागण झाल्यामुळे क्वॉरंटाइन असलेला संघाचा स्टार खेळाडू ऋतुराज गायकवाडचे दोन्ही कोरोना रिपोर्ट नेगेटिव्ह आले असून आता ऋतुराज पुन्हा संघात वापसी करणार आहे. दिग्गज खेळाडू सुरेश रैनाने या सीझनमधून माघार घेतल्यानंतर त्याच्या जागी ऋतुराजला संघात स्थान मिळालं होतं.
ऋतुराज गायकवाड दुबईत पोहोचल्यानंतर संघातील खेळाडूंसह 12 जणांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ऋतुराज गायकवाडला क्वॉरंटाइन करण्यात आलं होतं. तेव्हापासून ऋतुराज आयसोलेशमध्येच होता. परंतु, आता जवळपास 21 दिवसांनी ऋतुराज गायकवाडचे दोन्ही कोरोना रिपोर्ट नेगेटिव्ह आले आहेत.
ऋतुराज गायकवाड कोरोना निगेटिव्ह असून आता तो संघासोबत खेळणार असल्याची माहिती चेन्नई सुपर किंग्सच्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवरून देण्यात आली आहे. एवढंच नाहीतर सीएसकेने ऋतुराजचे फ्रॅक्टिस करतानाचे काही फोटोही शेअर केले आहेत.
दरम्यान, मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्सच्या सलामीच्या सामन्यात ऋतुराज गायकवाड सहभागी होऊ शकला नव्हता. त्याने दोन आठवड्यांचा क्वॉरंटाईनचा कालावधी पूर्ण केला होता. तसेच त्याच्यात कोणत्याही प्रकारची लक्षणंही नव्हती. परंतु, त्याला संघासोबत खेळण्यासाठी आयपीएलच्या अटींनुसार, दोन कोरोना टेस्ट कराव्या लागणार होत्या. दोन्ही टेस्टचा अहवाल नेगेटिव्ह आल्यानंतरच ऋतुराज संघासोबत खेळू शकणार होता. आता ऋतुराजच्या दोन्ही कोरोना टेस्ट नेगेटिव्ह आल्या असून आता तो मैदानात उतरणार आहे.
सीएसकेपुढे अनेक मोठी आव्हानं
दुबईत दाखल झाल्यापासूनच सीएसके अनेक आव्हानांचा सामना करत आहे. अशातच संघाचा स्टार फलंदाज सुरेश रैनाने कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहता आयपीएलमधून माघार घेत भारतात परतण्याचा निर्णय घेतला. रैनाने आयपीएलच्या 13व्या सीझनमध्ये खेळणार नसल्याची घोषणा केली होती. सीएसकेने रैनाच्या जागी ऋतुराज गायकवाडला संधी देण्याची इच्छा होती. परंतु, 20 दिवसांनंतरही त्याचा कोरोना व्हायरस अहवाल नेगेटिव्ह आलेला नव्हता. त्यामुळे पहिल्या सामन्यात तो सहभागी होऊ शकला नव्हता. तसेच दिग्गज स्पिनर हरभजन सिंहने देखील वैयक्तिक कारणामुळे आयपीएलच्या 13 व्यासीझनमधून माघार घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :