IPL 2022 : आयपीएलच्या 15 व्या (IPL 2022) हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरी अतिशय निराशाजनक झाली आहे. मुंबई इंडियन्सला यंदाच्या हंगामातील पहिल्या चारही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. रोहित शर्मा या पराभवाचं एक कारण आहे. कारण रोहित शर्माला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आलेली नाही. बुधवारी मुंबईचा संघ पंजाबविरोधात मैदानात उतरणार आहे. सूर्यकुमार यादवच्या पुनरागमनामुळे मुंबईची ताकद वाढली आहे. पंजाबविरोधात होणाऱ्या सामन्याआधी माजी कर्णधार संजय मांजरेकर यांनी रोहित शर्माबाबत मोठं वक्तव्य केले आहे. रोहित शर्मा आयपीएलमध्ये विराट कोहलीप्रमाणे कर्णधारपद सोडू शकतो, असं संजय मांजरेकर यांनी मत व्यक्त केले आहे. संजय मांजरेकर यांनी यामागील कारणही स्पष्ट केले आहे.  


आयपीएलच्या मागील तीन हंगामापासून रोहित शर्माला फलंदाजीमध्ये सातत्याने अपयश येत आहे. रोहित शर्माची लौकिकास साजेशी फलंदाजी होत आहे. स्ट्राईक रेटही घसरला आहे. मला वाटतेय की, आयपीएलमध्ये रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद सोडू शकतो. फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी रोहित शर्मा कर्णधारपदाचा भार कायरॉन पोलार्डच्या खांद्यावर देऊ शकतो, असे संजय मांजरेकर म्हणाले. 


रोहितला मोठा विक्रम करण्याची संधी - 
यंदाच्या हंगामात मुंबईला पहिल्या चारही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर पहिल्या चार सामन्यात पंजाबने दोन विजय मिळवले आहेत, तर दोन सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. मुंबई पहिल्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे, तर पंजाबचा संघ तिसऱ्या विजयासाठी मैदानात उतरेल. हा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर मोठा विक्रम होऊ शकतो. रोहित शर्माला टी 20 सामन्यात दहा हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे. यासाठी रोहित शर्माला 25 धावांची गरज आहे. पंजाबविरोधात रोहित शर्माने 25 धावा केल्यास तो हा कारनामा करणार आहे. रोहित शर्माने दहा हजार धावांचा पल्ला पार केल्यास असा पराक्रम करणारा रोहित दुसरा भारतीय खेळाडू होणार आहे. याआधी टी 20 क्रिकेटमध्ये विराट कोहलीने दहा हजार धावांचा पल्ला पार केला आहे. जागतिक क्रिकेटचा विचार केला तर सर्वाधिक धावा ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने टी 20 क्रिकेटमध्ये 14562 धावा केल्या आहेत. गेलने 463 सामन्यात हा कारनामा केला आहे. दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा शोएब मलिक आहे. मलिकने 11 हजार 698 धावा चोपल्या आहेत. विराट कोहलीने 330 सामन्यात 10379 धावा चोपल्या आहेत. यामध्ये पाच शतके आणि 76 अर्धशतकांचा समावेश आहे. टी 20 मध्ये सर्वाधिक धावा असणाऱ्या खेळाडूंमध्ये रोहित शर्मा सध्या सातव्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माने आतापर्यंत  374 सामन्यात 9975 धावा चोपल्या आहेत. पंजाबविरोधात होणाऱ्या सामन्यात 25 धावा करताच रोहित शर्मा टी 20 क्रिकेटमध्ये दहा हजार धावा पूर्ण करणार आहे.