IPL 2023, Mohammed Shami : गुजरात टायटन्स IPL 2023 च्या प्लेऑफच्या लढतीसाठी पात्र ठरणारा पहिला संघ आहे. गुजरात आणि हैदराबाद या दोन संघात सोमवारी 15 मे रोजी सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात गुजरातने हैदराबाद 34 धावांनी विजय मिळविला. या विजयामुळे आता गुजरातने प्लेऑफमधील आपलं स्थान निश्चित केलं आहे. या रोमहर्षक सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) आपल्या भेदक गोलंदाजीचं दर्शन घडवलं. त्याने 4 षटकांमध्ये 20 धावा देऊन महत्त्वाच्या 4 विकेट्स मिळवल्या. या जबरदस्त कामगिरीनंतर या वेगवान गोलंदाजाला त्याच्या डाएट प्लॅनवरुन प्रश्न विचारण्यात आला, ज्याचं शमीने अनोख्या अंदाजात उत्तर दिलं आहे. यामुळे सध्या शमी त्याच्या डाएट प्लॅनवरुन चर्चेत आला आहे.


भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शम्मीला हैदराबाद विरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यानंतर त्याच्या डाएट प्लॅनवरुन प्रश्न विचारला होता. "मला सांग की तू असं कोणतं जेवण खातोयस ज्यामुळे तू अधिक तंदुरुस्त होत आहेस. दीड महिने होऊन गेली आहेत, तापमानाचा पारा वाढत असूनही तू अधिक वेगाने धावत आहेस? असा प्रश्न रवी शास्त्री यांनी विचारला. 


यावर मोहम्मद शमीने वेगळ्या अंदाजात उत्तर दिलं, ज्यामुळे सगळेच आश्चर्यचकित झाले. शमीने सांगितलं की, "सध्या गुजरातमध्ये आहे. मला माझं जेवण मिळणार नाही. पण गुजराती जेवणाचा आनंदाने आस्वाद घेत आहे." असं उत्तर देताना शमीच्या चेहेऱ्यावर स्मितहास्य होतं. या उत्तराने रवी शास्त्री यांनाही हसायला आलं होतं. 


सामन्यानंतर शमीनं मोहित शर्माचं केलं काैतुक 


हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर मोहम्मद शमीने सांगितलं की, "मी माझ्या बलस्थानावर लक्ष केंद्रीत करत होतो आणि गोलंदाजी टाईट ठेवण्यासाठी प्रयत्न करत होतो. मी नेहमीच चांगल्या एरियात गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. दिल्ली विरुद्ध झालेल्या सामन्यासारखा चेंडू चांगलं वळण घेत होता. तसेच, मधल्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी मोहित शर्मासारखा गोलंदाज संघात असणं खूप चांगलं आहे. कारण तो वैविध्याचा विचारपूर्वक उपयोग करतो." 


पर्पल कॅप आपल्या नावावर


हैदराबाद विरुद्ध भेदक गोलंदाजी करताना चार विकेट्स घेतल्यानंतर मोहम्मद शमीने पर्पल कॅप आपल्या नावावर केली. यावर्षीच्या आयपीएल हंगामात शमीने 13 सामन्यात 16.70 च्या सरासरीने एकूण 23 विकेट्स मिळवल्या होत्या. याबाबतीत त्याच्या संघातील फिरकीपटू राशिद खान हा 23 विकेट्स घेऊन दुसऱ्या क्रमांवर आहे.