Gujarat Titans vs Kolkata Knight Riders Match Abandoned : अहमदाबाद येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना रद्द करण्यात आला. दोन्ही संघाला एक एक गुण देण्यात आले. आयपीएलच्या इतिहासात गुजरात टायटन्स पहिल्यांदाच प्लेऑफमध्ये खेळणार नाही. शुभमन गिल याच्या संघाचा आयपीएल 2024 चा प्रवास संपुष्टात आलाय. कोलकाता नाईट रायडर्सचे 19 गुण झाले आहेत. गुणतालिकेतील कोलकात्याचं स्थान टॉप 2 राहणार आहे. 


गुजरातचं आव्हान संपलं - 


सोमवारी गुजरातमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. आज सामना सुरु झाल्यानंतरही पावसाने जोरदार हजेरी लावली. काहीवेळासाठी पावसाने विश्रांती घेतली. ग्राऊंड स्टाफने मैदान सुखावण्याचा प्रयत्न केला. पण पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. गुजरातचं आव्हान संपुष्टात आलेय. गुजरातचे आता 13 सामन्यात 11 गुण झाले आहेत. यंदाच्या हंगामातील गुजरातचा अखेरचा सामना हैदराबादविरोधात होणार आहे. हा सामना जिंकून गुजरातचा संघ शेवट गोड करण्याचा प्रयत्न करणार आहे. 






शुभमन गिल याच्या गुजरातचा अहमदाबादमधील हा अखेरचा सामना आहे. त्यांचा अखेरचा सामना हैदराबादमध्ये होणार आहे. घरच्या मैदानातील अखेरचा सामना पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर शुभमन गिल आणि संपुर्ण संघाने अहमदाबादमधील सर्व चाहत्यांचे मनापासून आभार मानले.






कोलकाताचं स्थान अधिक भक्कम - 


श्रेयस अय्यरच्या कोलकाता नाईट रायडर्सचं गुणतालिकेतील स्थान अधिक भक्कम झाले आहे. कोलकात्याचं 13 सामन्यात 19 गुण झाले आहेत. त्यामुळे ते अव्वल दोन  क्रमांकावरच राहणार आहेत. कोलकात्यानं 13 सामन्यात 9 विजय मिळवले आहेत. कोलकात्याचा अखेरचा सामना 19 मे रोजी राजस्थान रॉयल्सविरोधात होणार आहे. राजस्थानचेही प्लेऑफमधील आव्हान जवळपास निश्चित झाले आहे. राजस्थान आणि कोलकाता यांच्यातील विजेता संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर राहणार आहे.