GT vs DC, IPL 2024 : शुभमन गिलच्या गुजरात टायटन्सच्या फलंदाजांनी घरच्या मैदानावर अतिशय खराब कामगिरी केली आहे. दिल्लीच्या भेदक माऱ्यापुढे गुजरातचा संपूर्ण संघ 17.3 षटकांमध्ये 89 धावांत ऑलआऊट झाला. राशीद खान याचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. गुजरातला 100 धावसंख्याही पार करता आली नाही.


अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर दिल्लीच्या गोलंदाजीसमोर गुजरातची दाणादाण उडाली. गुजरातचा संपूर्ण संघ 89 धावांत गारद झाला. दिल्लीकडून मुकेश कुमार यानं सर्वाधिक तीन फलंदाजांना तंबूत पाठवलं. गुजरातकडून राशीद खान यानं सर्वाधिक 31 धावांची खेळी केली. त्याचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. आयपीएलच्या इतिहासातील गुजरातची ही सर्वात निचांकी धावसंख्या ठरली.


दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्लीच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. गुजरातच्या एकाही फलंदाजाला मैदानावर स्थिरावू दिलं नाही. ठराविक अंतरावर दिल्लीच्या फलंदाजांना तंबूत पाठवलं. दिल्लीचा कर्णधार शुभमन गिल अवघ्या आठ धावा काढून बाद झाला. त्यानंतर वृद्धीमान साहा दोन धावा काढून बाद झाला. सलामी जोडी बाद झाल्यानंतर गुजरातच्या इतर फलंदाजांनी संयमानं फलंदाजी केली नाही. डेविड मिलरही दोन धावा काढून बाद झाला. त्यानंतर साई सुदर्शनही 12 धावांवर धावबाद झाला. गुजरहातची अवस्था पाच बाद 47 अशी दैयनीय झाली होती. 



राहुल तेवातिया, अभिनव मनोहर यांनाही गुजरातचा डाव सावरता आला नाही. अभिनव मनोहर आठ धावा काढून बाद झाला. तर राहुल तेवातिया 10 धावांवर बाद झाला. गुजरातची आघाडीची फळी तंबूत परतल्यानंतर इम्पॅक्ट म्हणून शाहरुख खान याला मैदानात उतरवण्यात आलं. पण शाहरुख खान गोल्डन डकचा शिकार झाला. ट्रिस्टन स्टब यानं लागोपाठ दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. 


दिग्गज फलंदाज तंबूत परतल्यानंतर राशिद खान यानं एकट्यानं लढा दिला. राशीद खानने दिल्लीच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. राशीदनं 24 चेंडूमध्ये 31 धावांची खेळी केली. यामध्ये दोन चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. गुजरातकडून फक्त राशीद खान यालाच षटकार मारता आला, इतरांच्या बॅटमधून एकही षटकार निघाला नाही. मोहित शर्मा 2, नूर अहमद 1 हेही लढा देऊ शकले नाहीत. 


दिल्लीच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. मुकेश कुमार यानं दिल्लीच्या तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. तो सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. ईशांत शर्मा आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. तर खलील अहमद आणि क्षर पटेल यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. कुलदीप यादवच्या विकेटची पाटी कोरीच राहिली.