Digvesh Rathi लखनौ : लखनौ सुपर जायंटस आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील मॅचमध्ये जोरदार राडा झाला होता. लखनौचा फिरकीपटू दिग्वेश राठी आणि हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्मा एकमेकांना भिडले. अभिषेक शर्मानं 20 बॉलमध्ये 59 धावांची आक्रमक खेळी केली होती. 8 व्या ओव्हरमध्ये दिग्वेश राठीला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला.यानंतर दिग्वेश राठीनं अभिषेक शर्माच्या दिशेनं धाव जात सही करत असल्याचा इशारा केला. यावरुन दोघांमध्ये जोरदार राडा झाला. या प्रकरणावरुन आयपीएलकडून दोघांवर कारवाई करण्यात आली आहे.दिग्वेश राठीला गुजरात टायटन्स विरुद्धच्या मॅचमधून निलंबित करण्यात आलं आहे. अभिषेक शर्मावर देखील कारवाई करण्यात आली आहे.
दिग्वेश राठीचं निलंबन
दिग्वेश राठीला अभिषेक शर्मासोबतच्या वादामुळं गुजरात टायटन्स विरुद्धच्या मॅचमधून निलंबित करण्यात आलं आहे. याशिवाय त्याच्या मॅच फी पैकी 50 टक्के दंड म्हणून वसूल केली जाणार आहे. याशिवाय सध्या त्याच्या नावावर 5 डिमेरीट पॉईंट असल्यानं त्याचं गुजरात टायटन्सचं निलंबन करण्यात आलं. अभिषेक शर्मावर देखील या वादामुळं कारवाई करण्यात आली आहे. त्याच्या मॅच फी पैकी 25 टक्के रक्कम कापली जाणार आहे. दिग्वेश राठीवर यापूर्वी देखील आयपीएलकडून कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी त्याला केवळ आर्थिक दंड आकारण्यात आला होता.
राजीव शुक्ला यांची मध्यस्थी
अभिषेक शर्मा आणि दिग्वेश राठी या दोघांचा वाद मैदानावर पंचांनी सोडवला होता. मॅच संपल्यानंतर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दोघांमध्ये मध्यस्थी केली. अभिषेक शर्मा आणि दिग्वेश राठी भांडण मिटल्यानंतर मैदानावर सोबत फिरत होते.
लखनौ प्लेऑफमधून बाहेर
लखनौ सुपर जायंटसनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 7 बाद 205 धावा केल्या होत्या. मिशेल मार्श आणि एडन मार्करम यांनी अर्धशतकी खेळी केली होती. त्यानंतर निकोलस पूरन यानं दमदार फलंदाजी केल्यानं लखनौनं 205 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर अभिषेक शर्मानं वादळी फलंदाजी करत सनरायजर्स हैदराबादच्या विजयाचा पाया रचला. त्यानं 20 बॉलमध्ये 59 धावा केल्या. हेनरिक क्लासेन आणि ईशान किशन या दोघांनी चांगली कामगिरी केली. सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पराभव झाल्यानं लखनौ सुपर जायंटसच्या प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. आता आयपीएल प्लेऑफच्या शर्यतीत दोन संघ राहिले आहेत. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यापैकी एक संघ प्लेऑफमध्ये जाईल. यापूर्वी गुजरात टायटन्स, पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेऑफमध्ये गेले आहेत.