Abhishek Sharma and Digvesh Rathi Fight: आयपीएल 2025 च्या हंगामात काल लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने 6 विकेट्सने विजय मिळवला. या पराभवासह लखनौचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. मिशेल मार्श, ऐडन मार्करम यांच्या अर्धशतकांच्या जोरावर लखनौने 20 षटकांत सात बाद 205 धावांपर्यंत मजल मारली. हैदराबादने 18.2 षटकांत चार बाद 206 धावा करत विजय साकारला. दरम्यान, लखनौ आणि हैदराबादच्या सामन्यात एक जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळाले.
लखनौचा गोलंदाज दिग्वेश राठी आणि हैदराबादचा फलंदाज अभिषेक शर्मा (Abhishek Sharma and Digvesh Rathi Fight) यांच्यात 8 व्या षटकांत राडा झाला. दिग्वेश राठीने आक्रमक फलंदाज अभिषेक शर्माला बाद केले. त्यानंर दोघांमध्ये काहीतरी बोलणं झाले आणि दोघंही एकमेकांच्या अंगावर धावून गेले. आता या वादाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. मात्र या दोघांमध्ये नक्की कशावरुन बिनसलं? हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
अभिषेक आणि दिग्वेशमधील भांडणात राजीव शुक्ला यांची मध्यस्थी-
सामना संपल्यानंतर दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मा यांच्यात मध्यस्थी करताना चक्क बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला देखील दिसले. सामना संपल्यानंतर राजीव शुक्ला अभिषेक शर्मा आणि दिग्वेश राठीसोबत बोलताना दिसले. परंतु काहीवेळनंतर दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मा यांच्यातील भांडण संपले आणि दोघंही एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून मैदानात फिरत होते.
आता प्लेऑफ साठी मुंबई आणि दिल्लीत स्पर्धा-
लखनौच्या एकना स्टेडियममध्ये हैदराबादला विजयासाठी 206 धावांची आवश्यकता होती. हैदराबादची सुरुवात चांगली झाली नाही. अथर्व तावडे 13 धावा करुन बाद झाला होता. मात्र, अभिषेक शर्मा आणि ईशान किशन यांच्या 82 धावांच्या भागीदारीमुळं हैदराबादनं कमबॅक केलं. अभिषेक शर्मानं 59 धावा केल्या तर ईशान किशन 35 धावा केल्या. यानंतर हेनरिक क्लान आणि कामिंदू मेंडिसनं 55 धावांची भागीदारी करत हैदराबादला विजयापर्यंत पोहोचवलं. लखनौला यंदाच्या आयपीएलमधील सातवा पराभव स्वीकारावा लागला. यामुळं लखनौ सुपर जायंटस प्लेऑफ च्या शर्यतीतून बाहेर पडलं आहे. आता प्लेऑफ साठी मुंबई आणि दिल्लीत स्पर्धा असेल. प्लेऑफमध्ये यापूर्वी गुजरात टायटन्स, पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु दाखल झाले आहेत.