DC vs GT, IPL 2024 : कर्णधार ऋषभ पंत आणि अष्टपैलू अक्षर पटेल यांच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीनं निर्धारित 20 षटकांत 4 विकेटच्या मोबदल्यात 224 धावांपर्यंत मजल मारली. ऋषभ पंत यानं 43 चेंडूत 88 तर अक्षर पटेल यानं 43 चेंडूत 66 धावांची खेळी केली. गुजरातकडून संदीप वॉरियर सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. वॉरियरनं तीन फलंदाजांना तंबूत पाठवलं. गुजरातला विजयासाठी 225 धावांचे आव्हान मिळाले.
गुजरातचा कर्णधार शुभमन गिल यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीला गिलचा निर्णय योग्य असल्याचं वाटलं. पण अक्षर पटेल आणि ऋषभ पंत यांनी शतकी भागिदारी करत गुजरातच्या स्वप्नावर पाणी फेरलं. दिल्लीने 44 धावांवर तीन फलंदाज गमावले होते. त्यानंतर अक्षर पटेल आणि ऋषभ पंत यांनी दिल्लीचा डाव सावरला. सलामी फलंदाज पृथ्वी शॉ 11 धावांवर बाद झाला. जर जेक मॅगर्क यानं 14 चेंडूत 23 धावांची खेळी केली. शाय होप याला मोठी खेळी करता आली नाही. होप फक्त पाच दावा काढून बाद झाला.
अक्षर पटेलचं अर्धशतक -
अष्टपैलू अक्षर पटेल याला गुजरातविरोधात फलंदाजीमध्ये बढती देण्यात आली. अक्षर पटेल यानं आपल्यावर दाखवलेला विस्वास सार्थ ठरवला. अक्षर पटेल यानं सुरुवातीला संयमी फलंदाजी केली, पण त्यानंतर गुजरातच्या गोलंदाजांची धुलाई केली. अक्षर पटेल यानं 43 चेंडूमध्ये 66 धावांचा पाऊस पाडला. अक्षर पटेल यानं 154 च्या स्ट्राईक रेटने धावा चोपल्या. अक्षर पटेल यानं आपल्या वादळी खेळीमध्ये चार षटकार आणि पाच चौकार ठोकले.
पंतची वादळी फलंदाजी -
ऋषभ पंत यानं कर्णधाराला साजेशी फलंदाजी केली. पंत यानं सुरुवातीला अक्षर पटेल याला चांगली साथ दिली. अक्षर पटेल बाद झाल्यानंतर पंतने डावाची सुत्रे हातात घेत गुजरातच्या गोलंदाजाची धुलाई केली. ऋषभ पंत याने 43 चेंडूमध्ये 88 धावांची खेळी केली. पंत यानं आपल्या विस्फोटक खेळीमद्ये आठ षटकारांचा पाऊस पाडला. त्याशिवाय त्यानं पाच चौकारही ठोकले. पंत यानं गुजरातच्या गोलंदाजांची 204 च्या स्ट्राईक रेटने पिटाई केली.
फिनिशिंग टच -
पंत आणि स्ट्रिस्टन स्टब्स यांनी दिल्लीला शानदार फिनिशिंग दिली. पंतने अखेरच्या षटकात तब्बल 31 धावा वसूल केल्या. ट्रिस्टन स्टब्स यानं फक्त सात चेंडूमध्ये 26 धावांची खेळी केली. यामध्ये दोन षटकार आणि तीन चौकारांचा समावेश आहे. पंत आणि स्टब्स यांच्यामध्ये 18 चेंडूमध्ये 67 धावांची भागिदारी झाली.
गुजरातची गोलंदाजी फ्लॉप -
संदीप वॉरियर याचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला प्रभावी मारा करता आला नाही. वॉरियर यानं तीन षटकात 15 धावा खर्च करत तीन फलंदाजांना बाद केले. नूर अहमद यानं एक विकेट घेतली. पण इतरांना अपयश आले. मोहित शर्मानं चार षटकात तब्बल 73 धावा खर्च केल्या. राशीद खान, ओमरजई, शाहरुख खान, साई किशोर यांना एकही विकेट मिळाली नाही.
गुणतालिकेत दोन्ही संघ कुठे ?
गुजरातने आठ सामन्यात चार विजय मिळवले आहेत. शुभमन गिलच्या गुजरातकडे आठ गुण आहेत. गुजरातचा संघ गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहेत. तर दिल्लीने आठ सामन्यात तीन विजय मिळवले आहेत. सहा गुणांसह दिल्लीचा संघ आठव्या क्रमांकावर आहे. दिल्ली आणि गुजरातसाठी आजचा सामना महत्वाचा आहे. प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी दिल्लीला आजचा विजय महत्वाचा आहे.