Chennai Super Kings vs Delhi Capitals IPL 2025 : चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर शनिवारी 5 एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या 17 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जचा 25 धावांनी पराभव केला. यासह, दिल्लीने या हंगामात विजयांची हॅटट्रिक साधली आणि पॉइंट टेबलमध्ये पहिले स्थान मिळवले. तर चेन्नईला सलग तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा सामना देखील खास होता कारण पहिल्यांदाच धोनीचे पालक त्याला पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आले होते, पण धोनी संघाला विजय मिळून देऊ शकला नाही. यासह, दिल्लीने 15 वर्षांनंतर चेपॉकमध्ये प्रथमच चेन्नईचा पराभव केला.

चेन्नईचा सलग तिसरा पराभव 

लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जची सुरुवातही खराब झाली, त्यांनी 14 धावांच्या आत दोन विकेट गमावल्या. रचिन रवींद्र (3) ला वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने धावबाद केले. दरम्यान, कर्णधार ऋतुराज गायकवाड (5) ला वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने आऊट केले. त्यानंतर विपराज निगमने दुसरा सलामीवीर डेव्हॉन कॉनवे (13) ला स्वस्तात बाद केले.

'इम्पॅक्ट प्लेयर' म्हणून आलेल्या शिवम दुबेही काही खास करू शकला नाही, फिरकीपटू विप्राजने 18 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर त्याला बाद केले. रवींद्र जडेजाकडून चांगली कामगिरी अपेक्षित होती. पण त्याला कुलदीप यादवने फक्त 2 धावा आऊट केले. जडेजा बाद झाला तेव्हा चेन्नईची धावसंख्या 5 बाद 74 धावा होती. येथून चेन्नईला विजयासाठी आक्रमक फलंदाजीची आवश्यकता होती, परंतु विजय शंकर आणि एमएस धोनी काही विशेष कामगिरी करू शकले नाहीत.

केएल राहुलने ठोकले अर्धशतक

दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण संघाची सुरुवात खुपच खराब झाली. कारण त्यांनी पहिल्याच षटकात जेक फ्रेझर-मॅकगर्कची विकेट गमावली. जेकला खातेही उघडता आले नाही. यानंतर, अभिषेक पोरेल आणि केएल राहुल यांनी दुसऱ्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी केली आणि डावाची सूत्रे हाती घेतली. फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाने पोरेलला बाद करून ही भागीदारी मोडली. पोरेलने 20 चेंडूंत 4 चौकार आणि 1 षटकारासह 33 धावा केल्या.

त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल चौथ्या क्रमांकावर आला. अक्षर आणि केएल राहुल यांनी चौथ्या विकेटसाठी 36 धावांची भागीदारी केली. 21 धावा काढल्यानंतर अक्षर नूर अहमदच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. अक्षर बाद झाल्यानंतर समीर रिझवीने केएल राहुलला चांगली साथ दिली. चौथ्या विकेटसाठी दोघांनी 56 धावांची भागीदारी केली, ज्यामुळे दिल्लीला गती मिळाली.

या भागीदारीदरम्यान केएल राहुलने 33 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. 20 धावा काढल्यानंतर समीर रिझवीला खलील अहमदने बाद केले. रिझवीनंतर, दिल्लीने शेवटच्या षटकात केएल राहुल आणि आशुतोष शर्मा (1) गमावले. राहुलने 51 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 77 धावा केल्या. चेन्नईकडून वेगवान गोलंदाज खलील अहमदने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या.