MS Dhoni parents attend CSK game : आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यातील सामना खेळला गेला. चेपॉकमध्ये खेळला जाणारा हा सामना ऐतिहासिक ठरू शकतो. हा सामना पाहण्यासाठी एमएस धोनीचे आई-वडील मैदानावर आले आहे. यानंतर, समालोचकांपासून ते चाहत्यांपर्यंत सर्वांनी एमएस धोनीच्या निवृत्तीबद्दल अंदाज बांधण्यास सुरुवात केली. 43 वर्षीय महेंद्रसिंग धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, पण तो आयपीएलमध्ये खेळत आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी गेल्या 5 वर्षांपासून फक्त आयपीएल खेळत आहे. पण या काळात, तो आयपीएलमधूनही निवृत्त होणार आहे का, असा प्रश्न अनेकदा उपस्थित होते. गेल्या दोन हंगामात या चर्चेला जास्त उधाण आले होते. विशेषतः आयपीएल 2023 मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली संघ चॅम्पियन झाल्यानंतर, धोनी निवृत्त होऊ शकतो असे मानले जात होते. पण चेन्नईच्या संघासाठी आणि चाहत्यांसाठी, धोनीने पुनरागमन केले आणि गेल्या हंगामातही खेळला.
पण आयपीएल 2025 च्या चौथ्या सामन्यात धोनीचे पालक अचानक चेन्नई सुपर किंग्जचा सामना पाहण्यासाठी आल्याच्या बातमीने चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यांना वाटत आहे की, धोनी निवृत्त होणार आहे का? 5 एप्रिल रोजी चेपॉक स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्धचा सामना सुरू होण्यापूर्वी, शो दरम्यान, जिओ-हॉटस्टारच्या अँकरने धोनीचे पालक सामना पाहण्यासाठी आल्याचे उघड केले आणि लगेचच ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. काही वेळाने त्याला टीव्ही स्क्रीनवर पाहिल्यानंतर, धोनीचे चाहते अधिकच घाबरले की कदाचित ते क्रिकेटच्या मैदानावर शेवटचेच त्यांच्या धोनीला पाहत आहेत का?
सचिनच्या निवृत्तीची आली आठवण....
एमएस धोनीच्या पालकांची पहिल्यांदाच मैदानावर उपस्थिती सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीशी जोडली जात आहे. जेव्हा सचिन तेंडुलकरने निवृत्तीचा निर्णय घेतला तेव्हा त्याने बीसीसीआयला एक खास विनंती केली होती. त्याची आई स्टेडियममध्ये येऊन सामना पाहू शकेल म्हणून त्याचा शेवटचा सामना मुंबईत व्हावा अशी विनंती होती. सचिन म्हणाला की, त्याला त्याची आई त्याच्या शेवटच्या सामन्याची साक्षीदार असावी असे वाटत होते.