LSG vs KKR : कोट्यवधी खर्च करुन घेतलेल्या खेळाडूंना यंदाच्या आयपीएल हंगामात अद्याप लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मिचेल स्टार्कपासून ग्लेन मॅक्सवेल, कॅमरुन ग्रीन ते सॅम करन, डेविड वॉर्नर या खेळाडूंना शानदार कामगिरी करता आलेली नाही. या यादीमध्ये लखनौच्या दीपक हुड्डा याचाही समावेश आहे. दीपक हुड्डाला यंदाच्या हंगामात तीन सामन्यात फक्त 44 धावाच करता आल्यात. कोलकात्याविरोधात दीपक हुड्डा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता, पण त्याला पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयश आले. कोलकात्याविरोधात दीपक हुड्डाला 10 चेंडूमध्ये फक्त 8 धावांची खेळी करता आली. दीपक हुड्डावर लखनौने कोट्यवधी रुपयांचा खर्च केला, पण त्यानुसार त्याला कामगिरी करता आलेली नाही. 


मागील दोन हंगामापासून लखनौ सुपर जायंट्स संघ दीपक हुड्डावर 5.75 कोटी रुपये खर्च करत आहे. पण दीपक हुड्डाच्या खराब फॉर्ममुळे लखनौचे कोट्यवधी रुपये पाण्यात जात आहेत. मागील दोन हंगामापासून दीपक हुड्डाला लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. कोलकात्याविरोधात देवदत्त पडीक्कलच्या जागी हुड्डाला संघात स्थान दिलं, पण खराब फॉर्ममुळे तो दोन आकडी धावसंख्याही पार करु शकला नाही. दीपक हुड्डाला दहा चेंडूमध्ये फक्त आठ धावाच करता आल्या. 


कोलकात्याविरोधात दीपक हुड्डा पाचव्या षटकात फलंदाजीसाठी मैदानात उतरला. दीपक हुड्डाकडे जम बसण्यासाठी पुरेसा वेळ होता. संयमाने फलंदाजी करत धावा जमवण्यासाठी मिळालेल्या संधीचं हुड्डानं सोनं केलं नाही. दीपक हुड्डा लवकर तंबूत परतल्यामुळे लखनौच्या इतर फलंदाजांवरही दबाव वाढला. मिचेल स्टार्कच्या चेंडूवर हुड्डाने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण रमनदीप यानं हुड्डाचा शानदार झेल घेतला. दीपक हुड्डासाठी 2023 हा हंगामही खराब ठरला होताा. त्याला 12 सामन्यात फक्त 84 धावाच करता आल्या होत्या.





दीपक हुड्डा दोन वर्षांपासून आऊट ऑफ फॉर्मच - 


मागील दोन वर्षांपासून दीपक हुड्डाची बॅट शांतच आहे. आयपीएलमध्ये 2022 मध्ये दीपक हुड्डाने अखेरचं अर्धशतक ठोकलं होतं. राजस्थानविरोधात हुड्डाने अर्धशतकी खेळी केली होती. त्यानं 39 चेंडूमध्ये 59 धावांच खेळी केली होती. त्यानंतर 15 डावात त्याला अर्धशतक ठोकताच आले नाही. मागील 15 डावातील त्याची सर्वोच्च धावसंख्या 45 इतकी राहिली आहे, ही खेळीही 2022 मध्येच झाली होती. आयपीएलच्या मागील 15 डावात दीपक हुड्डाला फक्त 128 धावा करता आल्यात. दीपक हुड्डा फ्लॉप होत असल्यामुळे लखनौचा मध्यक्रम कमकुवत झालाय. दीपक हुड्डाला लखनौचा संघ यापुढे संधी देणार का? याची चर्चा सुरु आहे