IPL 2022 : आयपीएलच्या 15 व्या हंगामात गुरुवारी लखनौ सुपर जायंट्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सबरोबर झाला. या सामन्यात लखनौनं दिल्लीवर विजय मिळवला. सलामी फलंदाज क्विंटन डिकॉकने दिल्लीबरोबर तुफानी फटकेबाजी करत अर्धशतकी खेळी केली. डिकॉकने दिल्लीबरोबरच्या सामन्यात सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे.


आयपीएलमध्ये क्विंटन डिकॉकने दिल्लीबरोबर 9 धावांची खेळी करताच सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला. सचिन तेंडुलकरने आयपीएल करिअरमधील 78 सामन्यात 2,334 धावा चोपल्या आहेत. या सामन्याआधी डिकॉक सचिनच्या धावांच्या नऊ धावा मागे होता. दिल्लीबरोबर 9 धावा करताच डिकॉकने सचिन तेंडुलकरच्या आयपीएलमधील धावांचा विक्रम मोडला आहे. आयपीएलमधील सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. दिल्लीबरोबर फलंदाजी करताना डिकॉकने अर्धशतकी खेळी करत लखनौच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दिल्लीने दिलेल्या 150 धावांचं आव्हान लखनौनं सहज पार केले. डिकॉकने 52 चेंडूत 82 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान डिकॉकने दोन षटकार आणि 9 चौकार लगावले.


लखनौच्या संघान दिल्लीला 6 विकेट्स पराभूत केला.  या सामन्यात नाणेफेक जिंकून लखनौच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात आलेल्या दिल्लीच्या संघाची सुरुवात चांगली झाली. त्यानंतर लखनौच्या गोलंदाजांनी कमबॅक करत दिल्लीला 149 धावांवर रोखलं. दिल्लीनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या लखनौच्या संघानं 6 विकेट्सनं विजय मिळवला आहे. नाणेफेक गमवल्यानंतर दिल्लीच्या संघाकडून मैदानात आलेल्या डेव्हिड वार्नरनं निराशाजनक कामगिरी केली. त्याला 12 चेंडूत 4 धावा करता आल्या. तर, पृथ्वी शॉनं 34 चेंडूत 61 धावांची आक्रमक खेळी केली.  त्यानंतर रोवमेन पोवेल याच्याकडून मोठी खेळीची अपेक्षा केली जात होती. परंतु, त्यानंही दिल्लीच्या चाहत्यांना निराश केलं. त्यानं 10 चेंडू खेळत फक्त 3 धावा केल्या. त्यानंतर मैदानात आलेल्या कर्णधार ऋषभ पंत आणि सरफराज खाननं संघाचा डाव पुढे नेला. या सामन्यात ऋषभ पंतनं 36 चेंडूत 39 तर, सरफराजनं 28 चेंडूत 36 धावांची नाबाद खेळी केली. ज्यामुळं दिल्लीच्या संघान 20 षटकात 3 विकेट्स गमावून 149 धावा केल्या. लखनौकडून रवी बिश्नोईनं दोन विकेट्स घेतल्या. तर, कृष्णप्पा गोथमनं एक विकेट्स मिळवली. दिल्लीच्या संघानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या लखनौच्या संघाची सुरुवात चांगली झाली.  कर्णधार केएल राहुल आणि क्विंटन डी कॉकनं पहिल्या विकेट्ससाठी 73 धावांची भागेदारी केली. परंतु, नवव्या षटकातील चौथ्या चेंडूवर केएल राहुलनं 24 धावांवर असताना आपली विकेट्स गमावली. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर तो आऊट झाला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या एविन लुईसनं निराशाजनक कामगिरी केली. त्यानं 13 चेंडूत फक्त पाच धावा केल्या. लखनौच्या संघानं चार विकेट्स गमावल्यानंतर क्रुणाल पांड्या आणि आयुष बदोनीनं संघाला विजय मिळवून दिला.