DC-W vs RCB-W, Match Highlights : वुमन्स आयपीएल स्पर्धेत स्मृती मंधानाच्या नेतृत्वातील आरसीबी संघाला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. आज झालेल्या सामन्यात दिल्लीने आरसीबीवर सहा विकेट्सने विजय मिळवला. आरसीबीचा हा सलग पाचवा पराभव होय. या पराभवानंतर स्मृती मंधना आणि आरसीबीला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. आरसीबीच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे तर काही चाहते स्मृती मंधानाच्या पाठिशी आहेत.
आज झालेल्या सामन्यात दिल्लीने नाणेफेकीचा कौल जिंकून आरसीबीला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले होते. आरसीबीने 20 षटकानंतर चार गड्यांच्या मोबदल्यात 150 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल दिल्लीने दोन चेंडू आणि सहा विकेट्स राखून हे लक्ष पार केले. आरसीबीला मात्र पाचवा पराभव स्विकारावा लागला आहे. आतापर्यंत आरसीबीला एकाही सामन्यात विजय मिळवता आला नाही. आरसीबी संघाचं या स्पर्धेतील आव्हान अधिक खडतर झाले आहे. गुणतालिकेत आरसीबीचा संघ तळाशी आहे. तर दिल्लीचा पाच सामन्यात हा चौथा विजय होय... दिल्लीचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
प्रथम फलंदाजी कराताना आरसीबीची सुरुवात अतिशय खराब झाली होती. कर्णधार स्मृती मंधानाला पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयश आले. ती फक्त 8 धावांवर बाद जाली. सहा षटकात आरसीबीला फक्त 29 धावा करता आल्या. सोफी डिवाइन हिने 21 धावांचे योगदान दिले. एका बाजूला विकेट्स पडत असताना एलिसा पेरी हिने दुसरी बाजू सांभाळली. एलिसा पेरिने 67 धावांची खेळी केली. हीथर नाइट हिने 11 धावांचे योगदान दिले. त्याशिवाय अखेरच्या षटकात ऋचा घोष हिने धावांचा पाऊस पाडला. ऋचा घोष हिने 37 धावांचे योगदान दिले. ऋचा घोष आणि एलिसा पेरी यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. एलिसा पेरी आणि ऋचा घोष यांच्या खेळींच्या बळावर आरसीबीने निर्धारित 20 षटकात 150 धावा केल्या होत्या.
आरसीबीने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली होती. अवघ्या एका धावेवर शेफाली वर्माला तंबूत परतावे लागले. त्यानंतर कर्णधान मेग लेनिंग आणि एलिसा कॅप्सी यांनी संघाचा डाव सावरला. पण मेग लेनिंग 15 धावांवर बाद झाली. तर अॅलिस कॅप्सी 38 धावांवर तंबूत परतली. जेमिमाने 32 धावांचे योगदान दिले. एम कप्प आणि जेस जोनासन यांनी संघाला विजय मिळवून दिला. जोनासनने 29 तर एम कप्प हिने 32 धावांची खेळी केली.