IPL 2022: ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज डेविड वार्नर (David Warner) हा यंदाच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे. आयपीएल 2022 मेगा ऑक्शनपूर्वी हैदराबादच्या संघानं डेविड वार्नरला रिलीज केलं. त्यानंतर दिल्लीच्या संघानं मेगा ऑक्शनमध्ये त्याच्यावर बोली लावली. ही पहिली वेळ नाही की, डेविड वार्नर दिल्लीसाठी खेळत आहे. आयपीएल 2009 मध्येही डेविड वार्नर दिल्लीच्या संघाचा भाग होता. तेव्हा दिल्लीच्या संघाचं नाव दिल्ली डेअरडेविल्स होतं. त्यावेळी भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) दिल्लीच्या संघाचा कर्णधार होता. दरम्यान, वीरेंद्र सेहवागनं डेविड वार्नरशी संबंधित 13 वर्षापूर्वीचा एक किस्सा सांगितला आहे. 


वीरेंद्र सेहवाग काय म्हणाला?
क्रिकबझशी बोलताना वीरेंद्र सेहवाग म्हणाला की,"मी माझा राग काही खेळाडूंवर काढला आणि डेव्हिड वॉर्नर त्यापैकी एक होता. कारण जेव्हा तो संघात सामील झाला तेव्हा तो सरावात उपस्थित राहण्यापेक्षा आणि खेळण्यापेक्षा जास्त पार्टी करायचा. पहिल्या वर्षी त्याचे काही खेळाडूंशी भांडणही झालं होतं. त्यामुळं आम्ही त्याला शेवटच्या दोन सामन्यांपूर्वी परत पाठवले होतं.कधीकधी असं होतं की धडा शिकवण्यासाठी तुम्ही काही लोकांना टीममधून बाहेर काढता. तो नवा खेळाडू होता. त्यामुळं त्याला दाखवून देणं गरजेचं होतं की, संघासाठी फक्त तूच महत्त्वाचा नाही, बाकीचेही खेळाडू महत्वाचे आहेत. तुमच्या एवजी खेळून संघाला विजयापर्यंत नेणारे इतर खेळाडू आहेत. आम्ही त्याला संघाबाहेर ठेवले आणि सामनेही जिंकले."


आयपीएल 2022 मध्ये दिल्लीची कामगिरी
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात ऋषभ पंत दिल्लीच्या संघाचं नेतृत्व करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या संघानं आतापर्यंत दहा सामने खेळले आहेत. त्यापैकी पाच सामने जिंकले तर, पाच सामने गमावले आहेत. आयपीएलच्या गुणतालिकेत दिल्लीचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी दिल्लीच्या त्यांच्या पुढील सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करून दाखवावी लागणार आहे. 


हे देखील वाचा-