CSK Vs RCB: IPL 2024: Latest Marathi News: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात 22 मार्च रोजी IPL 2024 च्या पहिल्या सामन्यात सामना होणार आहे. दोन्ही संघात स्टार खेळाडूंची कमतरता नाही, त्यामुळे एमए चिदंबरम स्टेडियमवर प्रेक्षणीय सामन्याची अपेक्षा करणे चुकीचे ठरणार नाही. विराट कोहली ते ग्लेन मॅक्सवेल आणि महेंद्रसिंग धोनी आणि इतर स्टार खेळाडू आपले सर्वोत्तम देण्यास तयार असतील. सीएसके विरुद्ध आरसीबी सामन्यात ज्यांच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या असतील अशा खेळाडूंबद्दल जाणून घेऊया.


1. विराट कोहली


विराट कोहली 2008 पासून इंडियन प्रीमियर लीगचा भाग आहे आणि 2010 पासून, विराट कोहलीने 300 पेक्षा कमी धावा केल्या असतील असा एकही हंगाम नाही. गेल्या मोसमातही त्याने 14 सामन्यांत 53.25 च्या सरासरीने 639 धावा केल्या होत्या. डावाची सुरुवात संथपणे करायची आणि शेवटी आक्रमक फलंदाजी करून सामन्याचा मार्ग बदलण्याची कोहलीची सवय झाली आहे. सीएसकेविरुद्धच्या सामन्यातही कोहलीची खेळी महत्त्वाची ठरू शकते.


2. ग्लेन मॅक्सवेल


ग्लेन मॅक्सवेलची बहुतेक क्रिकेट कारकीर्द पांढऱ्या चेंडूच्या फॉर्मेटला समर्पित राहिलेली आहे. मॅक्सवेलचे आकडे मधल्या फळीतील फलंदाज म्हणून उत्कृष्ट आहेत. केवळ फलंदाजीतच नाही तर गोलंदाजी करुन सामना फिरवण्याची क्षमता ग्लेन मॅक्सवेलमध्ये आहे. आयपीएल 2023 मध्ये, त्याने 14 सामन्यांमध्ये 400 धावा केल्या होत्या आणि त्याच्या आयपीएल कारकीर्दीत 31 विकेट्स देखील घेतल्या होत्या.


3. ऋतुराज गायकवाड


ऋतुराज गायकवाडने आयपीएल 2023 मध्ये 16 सामने खेळताना 590 धावा केल्या होत्या आणि यावेळी त्याच्याकडून पूर्वीपेक्षा चांगली कामगिरी अपेक्षित आहे. आयपीएल 2024 मध्ये सर्वांच्या नजरा त्याच्यावर असतील कारण एमएस धोनीने सीएसकेचे कर्णधारपद सोडले आहे आणि संघाची कमान ऋतुराज गायकवाडकडे सोपवली आहे. गायकवाड केवळ बॅटनेच सामन्याचा मार्ग बदलू शकत नाही, तर यावेळी तो आपल्या कर्णधारपदाच्या जोरावर तसे करू शकतो.


4. रचिन रवींद्र


आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023 दरम्यान रचिन रवींद्र पहिल्यांदाच प्रसिद्धीच्या झोतात आला. विश्वचषकात 10 सामन्यात 578 धावा करण्यासोबतच फिरकी गोलंदाजी करताना 5 विकेट्सही घेतल्या. चेन्नई सुपर किंग्जने त्याला आयपीएल 2024 च्या लिलावात 1.8 कोटी रुपयांना विकत घेतले आहे आणि तो या वर्षी इंडियन प्रीमियर लीगमध्ये पदार्पण करणार आहे. डेव्हॉन कॉनवेच्या अनुपस्थितीत रचिन ऋतुराज गायकवाडसोबत ओपनिंग करताना दिसणार आहे. 


5. मोहम्मद सिराज


मोहम्मद सिराज हा आयपीएल 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा मुख्य वेगवान गोलंदाज असेल. गेल्या मोसमात खेळलेल्या 14 सामन्यांत त्याने 19 विकेट घेतल्या होत्या. विशेषत: नव्या चेंडूने मोहम्मद सिराज चेन्नईच्या फलंदाजांना झटपट पॅव्हेलियनमध्ये पाठवू शकतो.