CSK IPL 2022 : आयपीएलच्या 15 व्या हंगामात धोनीच्या चेन्नईला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागलाय. टेबल टॉपर गुजरातने चेन्नईचा सात विकेटने पराभव केलाय. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघ 20 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. चेन्नईचा पराभव करत गुजरातने टॉप 2 मध्ये आपले स्थान पक्कं केलेय. गुजरातच्या संघाला फायनलला जाण्यासाठी दोन संधी मिळणार आहे. धोनीच्या नेतृत्वातील चेन्नईची यंदा लाजीरवाणी कामगिरी झाली आहे. चेन्नईला 13 सामन्यात फक्त चार विजय मिळवता आलेत.
चेन्नईला आज पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नईचा हा नववा पराभव होता. आयपीएलच्या इतिहासात चेन्नईला एका हंगामात इतक्या पराभवाचा कधीच सामना करावा लागला नव्हता. 15 वर्षाच्या आयपीएल इतिहासात चेन्नईची ही सर्वात लाजीरवाणी कामगिरी होय... आयपीएलच्या 15 व्या हंगामात चेन्नईचा अखेरचा सामना 20 मे रोजी राजस्थानविरोधात होणार आहे. हा सामना जिंकून दहा पराभवाचा नकोसा विक्रम टाळण्याचा प्रयत्न चेन्नई करेल.
चार वेळा आयपीएल चषक जिंकणाऱ्या चेन्नई संघाची यंदाच्या हंगामात निराशाजनक कामगिरी झाली. मुंबईनंतर चेन्नईलाही नऊ सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. आयपीएल 2022 मध्ये चेन्नई आणि मुंबई संघाचे प्रत्येक नऊ नऊ पराभव झाले आहेत. दोन्ही संघांनी मिळून आयपीएलच्या 9 चषकावर नाव कोरलेय. मुंबईने पाच तर चेन्नईने चार आयपीएल चषक उंचावलेत. पण यंदा या दोन्ही संघाला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. दोन्ही संघ गुणतालिकेत तळाशी आहेत. चेन्नईचा संघ नवव्या तर मुंबईचा संघ दहाव्या क्रमांकावर आहे.
चेन्नईची फलंदाजी फ्लॉप -
चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांनी गुजरातच्या गोलंदाजीपुढे गुडघे टेकले. ऋतुराज गायकवाड यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.मोईन अलीला चांगली सुरुवात मिळाली होती, पण मोठी खेळी करण्यात अपयश आले. मोईन अली 21 धावा काढून बाद झाला. एन जगदीशन याने संयमी फलंदाजी करत अखेरपर्यंत लढत दिली. जगदीशन 39 धावांवर नाबाद राहिला. ऋतुराज गायकवाडने 53 धावांची खेळी केली. चेन्नईने दिलेले 134 धावांचे आव्हान गुजरातने साहाच्या नाबाद अर्धशतकाच्या मदतीने सात गडी राखून पूर्ण केले.